ग्रेटर नोएडा वेस्टच्या गौर सिटी-२ येथील आम्रपाली गोल्फ होम्स सोसायटीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका तरुणाने फ्लॅटच्या बाल्कनीत आपल्या गर्लफ्रेंडला बेदम मारहाण केली आणि तिच्याशी गैरवर्तन केलं. ही संपूर्ण घटना समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण गर्लफ्रेंडला अमानुषपणे मारहाण करत असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. व्हायरल व्हिडिओची दखल घेत बिसरख पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि आरोपी तरुण इक्बाल याला अटक केली. तो २४ वर्षांचा असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेनंतर, पीडितेने पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली, यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली. तरुणी आपला जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली. पण तरीही तो तिला बेदम मारहाण करत असल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. नोएडा पोलीस आयुक्तालयाच्या मीडिया सेलने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, आरोपीविरुद्ध इतर कायदेशीर कारवाई देखील केली जात आहे.
या घटनेनंतर, समाजाच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. फ्लॅटमध्ये होणाऱ्या घरगुती हिंसाचाराबद्दल लोकांनी चिंता व्यक्त केली आहे आणि अशा घटनांवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे भयंकर प्रकरण उघडकीस आलं आहे.