१५ वर्षीय मुलीने आजीच्या खात्यातून ८० लाख काढले अन्...; शाळेतील 'ती' चूक पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 16:45 IST2025-03-05T16:45:22+5:302025-03-05T16:45:32+5:30
एका १५ वर्षीय विद्यार्थिनीला सोशल मीडियावरील मैत्रीची मोठी किंमत मोजावी लागली.

१५ वर्षीय मुलीने आजीच्या खात्यातून ८० लाख काढले अन्...; शाळेतील 'ती' चूक पडली महागात
गुरुग्राममध्ये एका १५ वर्षीय विद्यार्थिनीला सोशल मीडियावरील मैत्रीची मोठी किंमत मोजावी लागली. एका तरुणाने तिचे पर्सनल फोटो मॉर्फ करून तिला ब्लॅकमेल केलं. यानंतर भीतीपोटी मुलीने तिच्या आजीच्या बँक खात्यातून ८० लाख रुपये काढले आणि ते तरुणाच्या खात्यात ट्रान्सफर केले. फेब्रुवारी २०२४ मध्ये हे सुरू झालं आणि जवळपास आठ महिने चाललं. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे मुलगी पैसे देत राहिली. पण जेव्हा खात्यातील पैसे संपले आणि ब्लॅकमेलिंग थांबलं नाही तेव्हा हे प्रकरण उघडकीस आलं.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विद्यार्थिनीने तिच्या आजीच्या बँक खात्याचा उल्लेख शाळेतील एका मित्रासमोर केला होता. नंतर त्याच शाळेतील एका विद्यार्थ्याच्या मोठ्या भावाला याबाबत माहिती दिली. २० वर्षीय सुमित कटारियाने सोशल मीडियावर या मुलीशी मैत्री केली आणि तिचे काही फोटो मिळवले आणि ते मॉर्फ करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. मुलीचा फोन नंबरही मिळवला आणि धमक्या देऊ लागल्या.
सहा जणांना अटक
खात्यातील पैसे संपल्यानंतर विद्यार्थिनीला धमकावण्यास सुरुवात केली तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली. मुलीचं वागणं पाहून शिक्षकांना संशय आला. त्यानंतर त्यांनी याबाबत कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. डिसेंबर २०२४ मध्ये तपास सुरू झाला. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
जमीन विकून आले होते ८० लाख
पोलिसांनी आतापर्यंत ३६ लाख रुपये जप्त केले आहेत आणि उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. पोलीस प्रवक्ते संदीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी सुमित कटारिया आणि त्याच्या साथीदारांची ओळख पटली आहे. मुलीचे वडील दिल्लीत काम करतात तर तिच्या ७५ वर्षीय आजीला जमिनीच्या विक्रीतून ८० लाख रुपये मिळाले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.