मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 17:53 IST2025-08-29T17:52:56+5:302025-08-29T17:53:17+5:30
मुलीला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचे होते, परंतु वडिलांचा याला तीव्र विरोध होता. म्हणून...

मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला
आपल्याच पसंतीच्या मुलाशी लग्न करण्याचा हट्ट धरल्याने एका क्रूर बापाने आपल्या मुलीची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील बहादुरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, आरोपी पित्याने पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी केलेल्या तपासामुळे हे सत्य बाहेर आले आणि आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गीला रोपा गावात राहणाऱ्या बलिहार सिंह याने आपली मुलगी गुरनीत हिचा खून केला. गुरनीतला आपल्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करायचे होते, परंतु वडिलांचा याला तीव्र विरोध होता. याच वादामुळे २३ ऑगस्ट रोजी आरोपीने गुरनीत झोपलेली असताना तिच्या खोलीत जाऊन तिचा गळा दाबून खून केला.
खून लपवण्यासाठी केला 'हा' प्रयत्न
मुलीची हत्या केल्यानंतर पित्याने या प्रकरणाला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याने मुलीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवला. त्यानंतर घाईगडबडीत तिचा अंत्यसंस्कार करून अस्थीही विसर्जित केल्या. सुरुवातीला पोलिसांनाही हा आत्महत्येचाच प्रकार वाटला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गुरनीतच्या आईला विश्वासात घेऊन चौकशी केली. तेव्हा आईने पतीच्या धमक्यांना घाबरूनही हे संपूर्ण प्रकरण पोलिसांसमोर उघड केले.
दोन दिवसांपासून होता संधीच्या शोधात
पोलिसांनी आरोपी बलिहार सिंहला अटक केली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले की, 'गुरनीत वारंवार तिच्या आवडीच्या मुलाशी लग्न करण्याबाबत माझ्याशी वाद घालत होती. तिच्या हट्टीपणामुळे मी खूप संतापलो होतो आणि गेल्या दोन दिवसांपासून संधीच्या शोधात होतो. २३ ऑगस्ट रोजी ती दुपारी झोपलेली असताना, मी तिचा गळा दाबून खून केला.'
या प्रकरणात पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईमुळे पित्याचा क्रूर चेहरा समोर आला असून, त्याला आता कायद्यानुसार शिक्षा होणार आहे. आरोपीला अटक करून कारागृहात पाठवण्यात आले आहे.