विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 11:36 IST2023-03-24T11:36:04+5:302023-03-24T11:36:24+5:30
विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.

विरारमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार; दोन्ही आरोपींना अटक
नालासोपारा : विरारमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर दोन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. विरार पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांन्वये गुन्हे दाखल करून दोन्ही आरोपींना रात्री एक वाजण्याच्या सुमारास अटक केली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विरारमध्ये जंगल परिसरात १९ वर्षीय पीडित तरुणी आणि तिचा प्रियकर बुधवारी संध्याकाळी बसले होते. त्यावेळी येथे आलेल्या दोन्ही आरोपींनी प्रियकराच्या गळ्यातून सोन्याचे पेंडल खेचून पळ काढला. दोघेही ते सोन्याचे पेंडल विकण्यासाठी गेले. पण, कोणीही ते विकत घेतले नाही म्हणून दोन्ही आरोपी संध्याकाळी साडेसात-आठच्या सुमारास परत त्या परिसरात गेले. त्यावेळीही प्रियकर आणि प्रेयसी तिथेच बसलेले होते.
यावेळी दोन्ही नराधम आरोपींनी पीडित तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. दोघेही आरोपी मजबूत देहयष्टीचे होते, तर प्रियकर किरकोळ प्रकृतीचा आहे. त्यामुळे त्याने विरोध करूनही आरोपींनी जुमानले नाही. तसेच तेथून मदतीसाठी केलेली याचनाही कुणाला ऐकू गेली नाही. त्यावेळी विरोध करताना प्रियकराने बाजूला पडलेली काचेची बाटली एका आरोपीच्या डोक्यावर मारली. त्यात आरोपी जखमी झाला. त्यानंतर दोघेही पळून गेले.
डॉक्टरांकडून जखमी आरोपीची माहिती
ही माहिती विरार पोलिसांना मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तरुणीला उपचारासाठी डॉक्टरकडे पाठविले आणि फरार दोन्ही आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. एक आरोपी जखमी झाल्याने जवळच्या डॉक्टरकडे उपचारासाठी गेला असेल, असा पोलिसांना संशय होता. पोलिसांनी व्हाॅट्स ॲपच्या ग्रुपवर ही माहिती टाकल्यावर एका डॉक्टरांनी असा आरोपी उपचार घेत असल्याची माहिती पोलिसांना कळवली. त्यानुसार विरार पोलिसांनी रात्री एक वाजताच्या सुमारास दोन्ही आरोपींना अटक केली. दरम्यान, दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली आहे. आरोपींवर जबरी चोरी, खंडणी, बलात्कार, अनैसर्गिक बलात्कार अशा कलमान्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.