उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये कचरा वेचून उदरनिर्वाह करणाऱ्या दोन मुलांसोबत अमानवीय कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर कोतवाली परिसरातील देवी रोडवरील दुर्गा मंदिराजवळ एका तरुणाने या मुलांना थंडीत कपडे काढायला लावले, त्यांना 'कोंबडा' बनवलं आणि अमानुषपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरोपी मुलांचा सर्वांसमोर अपमान करत आहे. दोन्ही मुलांना जमिनीवर नाक घासायला भाग पाडलं गेलं आणि काठीने मारहाण करण्यात आली. ही दोन्ही मुलं कचरा वेचून स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. मुलं हात जोडून रडत होती, पण कोणाची मदत करायला पुढे आलं नाही. ही घटना समोर आल्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिक आरोपीवर कडक कारवाईची आणि मुलांना न्याय देण्याची मागणी करत आहेत.
या प्रकरणाबाबत सीओ सिटी मैनपुरी, संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करताना दिसत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, हा व्हिडीओ सदर कोतवाली क्षेत्रातील आहे. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस पथक पाठवण्यात आलं आहे आणि संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे."
सीओ सिटी पुढे म्हणाले की, व्हिडिओमध्ये दिसणारे लोक कोण आहेत आणि मुलांना अशा प्रकारे शिक्षा का देण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. अनेकदा लोक मुलांवर चोरीचा किंवा इतर बेकायदेशीर कृत्यांचा आरोप करून स्वतःच त्यांना शिक्षा देऊ लागतात, परंतु कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाही नाही. मुलांसोबत असं वर्तन करणे हा गंभीर गुन्हा आहे. तपास पूर्ण झाल्यावर समोर येणाऱ्या तथ्यांच्या आधारावर कायदेशीर कारवाई केली जाईल.