उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीचं मंदिराबाहेरून अपहरण झाल्याची पोलिसांना माहिती दिली. त्याचं आजच लग्न झालं होतं आणि तो त्याच्या वधूसोबत सप्तपदी घेतल्यावर बाहेर आला तेव्हा काही लोकांनी त्याच्या पत्नीचं अपहरण केलं. दिवसाढवळ्या एका वधूचं अपहरण झाल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी तपास करून वधूला शोधून काढलं. चौकशीदरम्यान वधूबद्दलचं असं सत्य उघड झालं की सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या वधूच्या अपहरणाची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती ती सामान्य वधू नव्हती तर लग्नाच्या नावाखाली लोकांना लुटणारी वधू होती. गुलशाना रियाज खान नावाची ही वधू गुजरातमध्ये काजल, हरियाणात सीमा, बिहारमध्ये नेहा आणि उत्तर प्रदेशात स्वीटी झाली होती. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी तिने १२ लग्नं केली. तिच्या या गँगमध्ये पुरुष आणि महिलाही होते.
ही गँग लग्नासाठी वधू शोधत असलेल्या कुटुंबीयांचा शोध घ्यायचे. ते मुलीचा फोटो दाखवून लग्न ठरवायचे. नंतर लग्नासाठी पैसे मागायचे. लग्न झाल्यानंतर हे लोक मुद्दाम नवरीचं अपहरण झाल्याचं नाटक करायचे आणि पळून जायचे. गुलशाना आणि तिच्या गँगने अनेक राज्यांमध्ये लग्नाचं जाळं पसरवलं. तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मॅट्रिमोनियल साइट्स आणि सोशल मीडियाचाही वापर केला.
पोलिस चौकशीत असंही उघड झालं की गुलशाना विवाहित आहे आणि तिच्या खऱ्या नवऱ्याचं नाव रियाज खान आहे. उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील रहिवासी रियाज खान हा शिंपी आहे, पण त्याला गुलशानाचे सर्व कारनामे माहित आहेत. हरियाणातील रोहतक येथील रहिवासी सोनूची ८०,००० रुपयांची फसवणूक केल्यानंतर पोलिसांनी या गँगचा पर्दाफाश केला.
लग्नानंतर वधूचं अपहरण झाल्यानंतर, सोनूने यूपी पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. आंबेडकर नगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत संपूर्ण गँगला पकडलं. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मोहनलाल, रतनकुमार सरोज, रंजन उर्फ आशु गौतम, मंजू माळी, राहुल राज, सन्नो उर्फ सुनीता, पूनम आणि रुखसार यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून ७२,००० रुपये रोख, एक मोटारसायकल, ११ मोबाईल फोन, एक सोन्याचे मंगळसूत्र आणि तीन बनावट आधार कार्ड जप्त केलं आहे.