बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद, पालघरमधील बनावट कारखाना उद्ध्वस्त, भायखळा गुन्हे शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 12:08 IST2025-01-14T12:08:31+5:302025-01-14T12:08:52+5:30
निवडणूक काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.

बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद, पालघरमधील बनावट कारखाना उद्ध्वस्त, भायखळा गुन्हे शाखेची कारवाई
पालघर/वाडा : वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतामध्ये नीरज वेखंडे या तरुणाच्या सहाय्याने भायखळा, मुंब्रा येथील तरुणांनी भारतीय चलनाच्या बनावट नोटा बनवण्याचा कारखाना सुरू केला होता. गेल्या सात महिन्यांपासून लाखो रुपयांच्या बनावट नोटा बनविणारा हा कारखाना भायखळ्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांनी शनिवारी उद्ध्वस्त केला. याप्रकरणी चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवडणूक काळात या कारखान्यात तयार केलेल्या बनावट नोटांचे मोठ्या प्रमाणात वितरण केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. नोटा बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताना पोलिसांनी चौघांना अटक केली. टोळीचा मुख्य सूत्रधार फरार आहे. उमरान उर्फ असिफ बलवले (वय ४८, रा. मुंब्रा), यासीन युनूस शेख (४२), भीम बडेला (४५, दोन्ही रा. भायखळा) आणि स्थानिक नीरज वेखंडे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
५०० रुपयांचा २०० बनावट नोटा
टोळीतील काही जण दुचाकीवरून भायखळा येथे बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. भायखळा येथे तीन व्यक्ती आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंगझडती घेतली असता ५०० रुपयांच्या २०० बनावट नोटा त्यांच्याकडे आढळल्या.
मुख्य आरोपी सुटला होता जामिनावर
फरार मुख्य आरोपी एका गुन्ह्यात जामिनावर सुटला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने नीरजच्या मदतीने बनावट नोटा बनवण्याचे नियोजन केले. त्यासाठी वाडा तालुक्यातील निहालपाडा येथील एका शेतात पत्र्याचे शेड बांधले. तेथे फरार आरोपी आणि नीरज दिवसभर बनावट नोटा तयार करत होते. बनावट नोटा ओळखण्याचे मशीनही त्यांच्याकडे होते. मशीनवर नोटा तपासूनच त्या विक्रीसाठी पुढे देत असत.