वाहनांची विक्री करून देण्याचे आमिष, फसवणूक करणाऱ्या टोळीस केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 06:01 IST2021-09-06T06:00:21+5:302021-09-06T06:01:05+5:30
त्याआधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदींच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.

वाहनांची विक्री करून देण्याचे आमिष, फसवणूक करणाऱ्या टोळीस केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वाहनांची विक्री करून देण्याचे आमिष दाखवून ती परस्पर दुसऱ्यालाच कोणतीही कागदपत्रे न बनविताच फसवणूक करणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून एका मर्सिडीज मोटारकारसह तीन वाहने जप्त केली आहेत.
डोेंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात ४ डिसेंबर २०१९ रोजी अशाच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. यातील एक कार ही तक्रारदाराला विश्वासात घेऊन एका ग्राहकाला विक्री करून देतो, अशी बतावणी करून परस्पर तिची दुसऱ्याच पार्टीला विक्री करून कमलेश जाधव नावाच्या व्यक्तीने फसवणूक केल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांना मिळाली होती.
त्याआधारे अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे आणि उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली होनराव, सहायक पोलीस निरीक्षक अशोक शेंडगे आणि हवालदार संदीप शिर्के आदींच्या पथकाने कमलेश जाधव याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्याला २२ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. यातील कार ही रायगड जिल्ह्यातील करंजडे (ता. पनवेल) येथे राहणाऱ्यास १३ लाख रुपयांमध्ये विक्री केली होती. ही कार त्याच्याकडून जप्त करण्यात आली. चौकशीमध्ये त्याने त्याचा साथीदार वसीम कुरेशी याच्यासह अशा प्रकारे ११ मोटारकारची मूळ मालक आणि दुसऱ्या पार्टीला विक्री केलेल्या व्यक्तींची फसवणूक केल्याचेही उघड झाले. यामध्ये अन्य एका कारचाही समावेश आहे. तीन कार जप्त केल्या आहेत. याप्रकरणी मानपाडा, मुंबईतील चेंबूर आणि पालघरमधील विरार पोलीस ठाण्यात अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. उर्वरित आठ वाहनांच्या मूळ मालकांचा तसेच ज्यांना विक्री केली आहे, त्या कार चालकांचा शोध घेतला जात आहे.