खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करीत टोळक्याने पसरविली दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 17:39 IST2019-03-25T17:37:54+5:302019-03-25T17:39:46+5:30
आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दळवी यांच्याकडे खंडणी मागितली.

खंडणी न दिल्याने दुकानदाराला मारहाण करीत टोळक्याने पसरविली दहशत
पिंपरी : दोन हजार रुपयांची खंडणी मागितली असता ती देण्यास नकार दिल्याने दुकानदाराला मारहाण टोळक्याने परिसरात दहशत पसरविली. ही घटना दिघीतील संत तुकारामनगर येथे रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.
मुन्ना उर्फ राजेश रविशंकर तिवारी (वय २२, रा. विठ्ठल रखुमाई सोसायटी, मोरेवस्ती, चिखली), अमित चंद्रकांत सोनवणे (वय-२४, रा. गुरुकृपा कॉलनी, सिद्धेश्वर हायस्कूलजवळ, दिघी रोेड, भोसरी), विजय मनबहादूर थापा (वय २३, रा. विकास कॉलनी, संतोषीमाता मंदीरासमोर, लांडेवाडी, भोसरी) यांना अटक केली असून अल्पेश मुरकर (रा. लांडेवाडी, भोसरी) याच्यासह इतर दोन ते तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी लक्ष्मण वाघोजी दळवी (वय ७५, रा. संत तुकारामनगर, मानस सरोवर, दिघी रोड, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फियार्दी दळवी हे संत तुकारामनगर येथील सागर प्रोव्हिजन स्टोअर या त्यांच्या दुकानात असताना त्याठिकाणी आलेल्या आरोपींनी बेकायदा जमाव जमवून दळवी यांच्याकडे दोन हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी दळवी यांनी नकार दिला असता त्यांना दुकानातून बाहेर ओढून धमकी देत शिवीगाळ केली. तसेच त्यांना आरोपी हाताने मारहाण करीत असताना त्यांची सोडवणूक करण्यासाठी सचिन फुगे आले असता त्यांना देखील आरोपींनी शिवीगाळ व हाताने मारहाण करीत परिसरात दहशत निर्माण केली. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहे