मित्र झाले वैरी! ६० हजारांच्या सोनसाखळीसाठी तिघांनी घेतला मित्राचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 16:00 IST2018-12-12T15:56:15+5:302018-12-12T16:00:34+5:30
आरोपींमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

मित्र झाले वैरी! ६० हजारांच्या सोनसाखळीसाठी तिघांनी घेतला मित्राचा जीव
मुंबई - 60 हजार रुपयांच्या मित्राच्या गळ्यातील सोनसाखळीसाठी तिघांनी मिळून मित्राची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गोवंडी परिसरातील ही घटना घडली आहे. आरोपींमध्ये 16 वर्षीय अल्पवयीन तरुणाचाही समावेश आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला अविनाश दिलपे, कृष्णा सुतार आणि 16 वर्षीय अल्पवयीन मुलाने राजू गायकवाडला दारु पिण्यासाठी बोलावलं होतं. यावेळी तिघांनी राजू गायकवाड याच्यावर हल्ला करत त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली आणि खाडीत ढकलून दिलं. दुसऱ्या दिवशी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद केली. 7 डिसेंबरला यल्लो गेटला एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षास देण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सुयोग कुलकर्णी यांनी राजू गायकवाड यांच्या कुटुंबाला मृतदेहाचा फोटो दाखवला असता त्यांच्या पत्नीने ओळख पटवली अशी माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी दिली आहे. गायकवाड यांच्या पत्नीला 16 वर्षीय आरोपीच्या भावाने ते घसरुन खाडीत पडले असतील अशी शक्यता बोलून दाखवली. यावरुन आम्हाला संशय आला आणि आम्ही अल्पवयीन तरुणाची चौकशी केली असता त्याने घडलेला हत्येच्या कटाबाबत सांगितले अशी माहिती पोलिसांनी दिली.