ठगबाज प्रीतीची कारागृहात रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 23:01 IST2020-06-25T22:59:59+5:302020-06-25T23:01:37+5:30

कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिची जरीपटक्यातील गुन्ह्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयातून कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र सीताबर्डीच्या गुन्ह्यात पोलीस तिला शुक्रवारी पुन्हा प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असून तिची चौकशी करणार आहेत.

Fraud Preeti sent to jail | ठगबाज प्रीतीची कारागृहात रवानगी

ठगबाज प्रीतीची कारागृहात रवानगी

ठळक मुद्देशुक्रवारी पुन्हा होणार अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुख्यात महाठग प्रीती ज्योतिर्मय दास हिची जरीपटक्यातील गुन्ह्याची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज न्यायालयातून कारागृहात रवानगी करण्यात आली. मात्र सीताबर्डीच्या गुन्ह्यात पोलीस तिला शुक्रवारी पुन्हा प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे ताब्यात घेणार असून तिची चौकशी करणार आहेत.
कुणासोबत लग्न करून, कुणाला नोकरीचे आमिष दाखवून तर कुणाला वेगवेगळे काम करून देण्याची बतावणी करून प्रीती दासने शेकडो जणांना गंडविले आहे. तिच्याविरुद्ध पाचपावली, लकडगंज, जरीपटका आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी पाचपावली पोलिसांनी तिला अटक करून तिचा तपास केला. हा तपास सुरू असतानाच लकडगंजमधील प्रकरणात तिला न्यायालयातून जामीन मिळाला. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांनी संशय घेत जोरदार आवाज उठवला. परिणामी या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी गुन्हे शाखेकडे सोपविला. तीन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक भानुदास पिदुरकर यांनी प्रीती दास हिला जरीपटक्याच्या गुन्ह्यात अटक केली. तीन दिवसाच्या तपासात पोलिसांनी तिच्याकडून दहा हजार रुपये आणि काही कागदपत्रे जप्त केली. तिच्या कोठडीचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिची कारागृहात रवानगी केली. त्यामुळे सीताबर्डीतील फसवणुकीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेचे पथक तिला शुक्रवारी कारागृहातून ताब्यात घेणार आहे.

भंडारा पोलिसांचीही हालचाल
भंडारा पोलिसांनी प्रीतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात पोलिसांच्या रेकॉर्डवर प्रीती फरार आहे. तिच्या अटकेनंतर पोलिसांच्या कार्यशैलीवर संशय घेतला जात असल्यामुळे आता भंडारा पोलिसांनाही जाग आली आहे. त्यामुळे नागपूर पोलिसांचा तपास संपल्यानंतर भंडारा पोलिसही तिला ताब्यात घेणार आहेत.

Web Title: Fraud Preeti sent to jail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.