पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने केली फसवणूक; तरुणाला मीरा भाईंदर येथून करण्यात आली अटक

By नारायण बडगुजर | Published: May 11, 2024 07:11 PM2024-05-11T19:11:09+5:302024-05-11T19:11:39+5:30

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलची कारवाई

Fraud on the pretext of a part-time job; The youth was arrested from Mira Bhayander | पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने केली फसवणूक; तरुणाला मीरा भाईंदर येथून करण्यात आली अटक

पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने केली फसवणूक; तरुणाला मीरा भाईंदर येथून करण्यात आली अटक

नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: पार्ट टाईम जॉबच्या बहाण्याने एका व्यक्तीची ३२ लाख ९२ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सायबर सेलने कौशल्यपूर्वक तांत्रिक तपास करत मीरा भाईंदर येथून तरुणाला अटक केली.

जैद जाकीर खान (२०, रा. मीरा भाईंदर, ठाणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एजन्सीची भरती असल्याचे सांगत घरातून पार्ट टाईम जॉब करण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीने सांगवी येथील एका व्यक्तीला संपर्क केला. फोनवरील व्यक्तीने आमचा हॉटेलचा व्यवसाय असून तो वाढविण्यासाठी आम्ही जाहिरात करत आहोत. आपल्याला घरी बसून आमची मदत करता येईल, असे सांगितले.

त्यानंतर सांगवी येथील व्यक्तीला एक लिंक पाठवून टास्क देत लाईक आणि शेअर करण्यास सांगितले. सांगवी येथील व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांना पाच हजार रुपये गुंतवण्यास सांगितले. त्याबदल्यात त्याने सहा हजार ५०० रुपये दिले. त्यानंतर आणखी टास्क देऊन गुंतवणूक करण्यास सांगत सांगवी येथील व्यक्तीकडून त्याने वेगवेगळ्या बँक खात्यांवर ३२ लाख ९२ हजार ५६३ रुपये घेत फसवणूक केली.

याप्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा समांतर तपास करत सायबर सेलने संशयित व्यक्तीचा तांत्रिक पद्धतीने शोध घेतला. त्यात संशयित व्यक्ती मीरा भाईंदर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला मीरा भाईंदर परिसरातून अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईल फोन जप्त केला.

पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी, उपनिरीक्षक रवींद्र पन्हाळे, पोलिस अंमलदार अतुल लोखंडे, कृष्णा गवळी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ओळखीच्या लोकांच्या नावे बँक खाते

संशयित जैद खान याच्या नावावर एक बँक खाते आहे. त्यावर १८ लाख रुपयांचा अधिकचा व्यवहार झाला आहे. इतर पैसे त्याने ओळखीच्या लोकांच्या नावाने बँक खाते सुरू करून त्यावरून केला. जैद खान याच्या विरोधात इतर राज्यात दोन तक्रारी दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

Web Title: Fraud on the pretext of a part-time job; The youth was arrested from Mira Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.