नाशकात फसवणुकीचा भोंगा; साऊंड सिस्टीमची परस्पर विक्री करून चार लाखांची फसवणूक
By नामदेव भोर | Updated: August 5, 2022 16:15 IST2022-08-05T16:14:36+5:302022-08-05T16:15:51+5:30
घरगुती कार्यक्रमाला घेऊन गेलेली साऊंड सिस्टीम परत आणूनच दिली नाही

नाशकात फसवणुकीचा भोंगा; साऊंड सिस्टीमची परस्पर विक्री करून चार लाखांची फसवणूक
नामदेव भोर, नाशिक: राज्यात काही दिवसांपासून भोंग्यावरून जोरदार राजकारण सुरू असताना नाशिकमध्ये एका साउंड सिस्टीम व्यावसायिकांकडून काही भोंगे घेत त्यांची परस्पर विक्री करून फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिकमधील भाभानगर येथील नवशक्ती चौकातील एका मंडप डेकोरेटर्स अँड साऊंड सिस्टीम व्यावसायिकाकडून घरगुती कार्यक्रमात वापरण्यासाठी सुमारे चार लाख रुपयांची साऊंड सिस्टीम घेऊन गेले. मात्र, ती परत आणून न देता परस्पर विक्री केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भाभानगरच्या नवशक्ती चौकातील अमोल अरुण हिरवे (३९, रा. हिरवे फार्म, कौटेघाट रोड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांची जवळपास चार लाख रुपये किमतीची साऊंड सिस्टीम १० ऑक्टोबर २०२०पासून संशयित विक्रम रतनलाल बागूल (४०, सरोजनी सोसायटी, पेंढारकर कॉलनी, जेलरोड) याने घरगुती कार्यक्रमासाठी नेली होती. मात्र, तब्बल दोन वर्षे उलटून गेली तरी संशयिताने साऊंड सिस्टीम परत न करता परस्पर विक्री केली. तसेच त्यातून मिळालेले पैसे त्याच्या फायद्यासाठी वापरून अमोल हिरवे यांची फसवणूक केली. याप्रकरणी अमोल हिरवे याने मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेत या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला आहे.