कविता म्हटली नाही म्हणून चार वर्षांच्या मुलास मारहाण; उल्हासनगरमध्ये शिक्षिकेवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 05:49 IST2025-09-21T05:48:53+5:302025-09-21T05:49:42+5:30
एका मुलाला शिक्षिका मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला.

कविता म्हटली नाही म्हणून चार वर्षांच्या मुलास मारहाण; उल्हासनगरमध्ये शिक्षिकेवर गुन्हा दाखल
उल्हासनगर - शहरातील प्लेग्रुपमधील चार वर्षांच्या चिमुकल्याला १७ ऑगस्ट रोजी शिक्षिकेकडून मारहाण झाल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात शिक्षिकेवर गुन्हा दाखल झाला आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळेजवळील एक्सलेंट प्लेग्रुपमध्ये चार वर्षाचा मुलगा शिकायला जात होता. तो आजारी पडल्याने, मुलाच्या पालकांनी याबाबत शिक्षिकेकडे विचारणा केली. मात्र तिच्याकडून योग्य कारण देण्यात आले नाही. दरम्यान एका मुलाला शिक्षिका मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला.
मुलाच्या पालकांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मुलाने कविता बोलून दाखविली नाही. तसेच टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केला. याबाबत विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण होऊ शकला नाही.