आर्वी गावावर शाेककळा! एकाच कुटुंबातील चार जणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ७ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 20:09 IST2022-04-23T20:09:06+5:302022-04-23T20:09:16+5:30
लातूर तालुक्यातील आर्वी येथील शिवाजी साेमवंशी यांच्या राडी येथील नातेवाईकाच्या घरी मावंद्याचा शनिवारी कार्यक्रम हाेता. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एका जीपमधून राडीकडे निघाले हाेते.

आर्वी गावावर शाेककळा! एकाच कुटुंबातील चार जणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात ७ ठार
लातूर : बीड जिल्ह्यातील राडी (ता. अंबाजाेगाई) येथील उत्तमराव गंगणे यांच्या घरी मावंद्याचा कार्यक्रम हाेता. दरम्यान, शनिवारी सकाळी लातूर जिल्ह्यातील आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एकाच जीपमधून निघाले हाेते. राडी गाव अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर हाेते. त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर अचानक झडप घातली. या अपघातात आर्वी येथील साेमवंशी कुटुंबातील चार आणि चालकाचा मृत्यू झाला. तर कासारखेडा आणि मळवटी येथील दाेन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताने आर्वी, कासारखेडा आणि मळवटी गावावर शाेककळा पसरली.
लातूर तालुक्यातील आर्वी येथील शिवाजी साेमवंशी यांच्या राडी येथील नातेवाईकाच्या घरी मावंद्याचा शनिवारी कार्यक्रम हाेता. दरम्यान, या कार्यक्रमासाठी आर्वी, कासारखेडा आणि मळवटी येथील नातेवाईक एका जीपमधून राडीकडे निघाले हाेते. आर्वी येथून सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास जीप मार्गस्थ झाली. एका तासाच्या अंतरावर अंबाजाेगाईनजीकच्या आंबा साखर कारखाना परिसरात समाेरुन येणाऱ्या ट्रकचा आणि जीपचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण हाेता की, जीपचा चेंदामेंदा झाला. गावातून राडीकडे निघालेल्या जीपचा अपघात झाल्याचे वृत्त गावात धडकताच शाेककळा परसरली. यामध्ये साेमवंशी कुटुंबातील स्वाती बाेडके (३०), वनमाला साेमवंशी (४५), शकुंतला साेमवंशी (३०), साेहम साेमवंशी (१०) आणि जीपचालक खंडू राेहिले (४० सर्व रा. आर्वी ता. जि. लातूर) आणि सराेजाबाई कदम (३८, मळवटी ता. जि. लातूर), चित्रा शिंदे (३५ रा. कासारखेडा ता जि. लातूर) यांचा मृत्यू झाला आहे. वनमाला साेमवंशी आणि स्वाती बाेडके या दाेघी मायलेकी हाेत्या. तर इतर आकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर अंबाजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर यातील एकाला लातूरच्या खाजगी रुग्णालयात सायंकाळी दाखल केले आहे.
रुग्णवाहिका पाहून फाेडला हंबरडा...
मृतदेह घेवून येणारी रुग्णवाहिका गावात प्रवेश करताच गावातील नातेवाईकांनी एकच हंबरडा फाेडला. हे दृश्य हृदय पिळवटून टाकणारे हाेते. अपघाताचे वृत्त गावात धडकताच सर्वत्र शाेककळा पसरली. आर्वी गावात रात्री उशिरा पाच जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अन्य दाेघांवर मळवटी आणि कासारखेडा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.