गँगस्टर सुरेश पुजारीच्या पोलीस कोठडीमध्ये चार दिवसांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 09:15 PM2022-04-25T21:15:53+5:302022-04-25T21:16:50+5:30
Suresh Pujari : आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाणे: उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चानंद उर्फ सच्चू कारीरा यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेला गँगस्टर सुरेश पुजारी याच्या पोलीस कोठडीमध्ये ठाणे मोक्का न्यायालयाने सोमवारी चार दिवसांची वाढ केली आहे. त्याला आता २९ एप्रिलपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
केबल व्यावसायिक कारीरा यांच्यावर ११ सप्टेंबर २०१५ रोजी उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरातील त्यांच्या कार्यालयात शिरुन एका टोळक्याने गोळीबार केला होता. या हल्ल्यात कारीरा यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. ही हत्या गुंड सुरेश पुजारी याने घडवून आणल्याचा आरोप आहे. याच प्रकरणामध्ये पुजारी सध्या उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. त्याच्या कोठडीची मुदत सोमवारी संपली. त्यामुळे उल्हासनगर पोलिसांनी त्याला सोमवारी ठाणे विशेष मोक्का न्यायालयात हजर केले. या गुन्ह्यात अद्याप तपास अपूर्ण असल्याने आरोपी सुरेश पुजारीच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. सर्व बाजू पडताळल्यानंतर मोक्का न्यायालयाने त्याच्या कोठडीत २९ एप्रिलपर्यंत वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली.