चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:38 IST2025-10-21T14:36:38+5:302025-10-21T14:38:20+5:30
दिवाळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर शहर पोलिसांनी उधळला मोठा डाव

चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
चंद्रपूर: दिवाळीच्या पूर्वसंध्येला चंद्रपूर शहर पोलिसांनी मोठा डाव उधळत दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजर असा शस्त्रसाठा जप्त केला. शनिवारी रात्री गंजवॉर्ड येथे केलेल्या या कारवाईत चंद्रेश उर्फ छोटू देसराज सूर्यवंशी, बोरीस श्रीनिवास कुसुमा, मुकेश राजू वर्मा ऊर्फ टंक्यू, अमित बाडकुराम सोनकर सर्व रा. बल्लारपूर या चौघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
२० ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनच्या डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार रात्री गस्त घालत असताना, रेकॉर्डवरील आरोपी छोटू सूर्यवंशी (रा. बल्लारपूर) आपल्या साथीदारांसह काळ्या रंगाच्या कारने गंजवार्ड येथील दादामिया ट्रान्सपोर्ट गॅरेजसमोर देशी कट्टा घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांचे पथक रवाना झाले. दरम्यान त्या ठिकाणी संशयास्पद हालचाल दिसताच पोलिसांनी तात्काळ घेराव घातला. त्यावेळी आठ जणांपैकी चार जण पळून गेले, तर चार जणांना पोलिसांनी शिताफीने पकडले.
कारची झडती घेतली असता दोन देशी कट्टे, दोन माऊझर गन, ३५ जिवंत काडतुसे, चार लोखंडी खंजर व अन्य साहित्य असा मोठा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी शस्त्रासह १७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास ठाणेदार निशिकांत रामटेके करीत आहेत.
शहर पोलिसांत गुन्हा दाखल
शहर पोलिसांनी, भा.दं.वि. कलम ३१०(४) सह भारतीय हत्यार कायदा कलम ३, ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंद केला असून फरार आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना केली आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुदर्शन मुमक्का, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौघुले, ठाणेदार निशीकांत रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी राजेंद्र सोनवने, पो.उपनि दत्तात्रय कोलटे, विलास निकोडे, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, इमरान शेख, सचिन बोरकर, निकेश ढेगे, रुपेश परते, जावेद सिद्दिकी यांच्यासह पोलिसांच्या पथकाने केली.