श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खजिनदार देशमुख यांना अटक, वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत २९ कोटी उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 07:43 IST2022-06-19T07:42:39+5:302022-06-19T07:43:16+5:30
Crime News: सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून रोखीने अवैधरीत्या २९ कोटी रुपये घेतल्याप्रकरणी कोल्हापूरस्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली.

श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशनचे माजी खजिनदार देशमुख यांना अटक, वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत २९ कोटी उकळले
मुंबई : सुमारे ३५० विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशाचे आमिष दाखवत त्यांच्याकडून रोखीने अवैधरीत्या २९ कोटी रुपये घेतल्याप्रकरणी कोल्हापूरस्थित श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे माजी खजिनदार अप्पासाहेब रामचंद्र देशमुख यांना शुक्रवारी मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने (सक्तवसुली संचालनालय) अटक केली. त्यानंतर त्यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.
२४ जूनपर्यंत त्यांची रवानगी ईडीच्या कस्टडीमध्ये करण्यात आली आहे. या प्रकरणी मे महिन्यात अप्पासाहेब देशमुख यांचे बंधू आणि संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव देशमुख यांनादेखील ईडीने अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, २०११ ते २०१६ या कालावधीमध्ये अप्पासाहेब देशमुख हे श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार होते. देशमुख यांनी त्यांचे बंधू आणि संस्थेचे माजी अध्यक्ष महादेव रामचंद्र देशमुख यांच्याशी संगनमत करून संस्थेच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेशाचे आमिष दाखवले. हे करताना या दोघांनी ३५० विद्यार्थ्यांकडून २९ कोटी रुपये रोखीने गोळा केले.
पैसे घेऊनही विद्यार्थ्यांना संस्थेत प्रवेश दिला नव्हता. तसेच, जमा झालेल्या पैशांचा स्त्रोत लपविण्यासाठीच हे पैसे त्यांनी रोखीने गोळा केले आणि कालांतराने हे पैसे अप्पासाहेब देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा केले, असा ठपकाही ईडीने ठेवला आहे. या प्रकरणी सातारा जिल्ह्यातील वडूज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर आर्थिक फसवणुकीची व्याप्ती लक्षात आल्यानंतर हा तपास ईडीकडे देण्यात आला.
प्रवेशाविना पैसे घेतले
- श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीला २०१२-१३ आणि सन २०१३-१४ या दोन वर्षांसाठी वैद्यकीय महाविद्यालय चालविण्याची अनुमती मिळाली होती. १०० वैद्यकीय जागांना मान्यता देण्यात आली.
- ८५ जागा या सरकारी कोट्यातून तर उर्वरित १५ जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्यास अनुमती होती.
-२०१४ मध्ये पुढील वर्षासाठी वैद्यकीय महाविद्यालय चालविण्यासाठी संस्थेला अनुमती दिली नाही. मात्र, तरीही प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळून त्यांना प्रवेशही न दिल्यामुळे तपास सुरू आहे.