परदेशी महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत अश्लील चाळे; गुन्हा नोंदवत आरोपीला केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2024 06:14 IST2024-12-14T06:13:58+5:302024-12-14T06:14:14+5:30
मैत्रिणीच्या मुलाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली.

परदेशी महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत अश्लील चाळे; गुन्हा नोंदवत आरोपीला केली अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशातून कुलाब्यातील मैत्रिणीकडे राहण्यास आलेल्या ५८ वर्षीय महिलेचा घरापर्यंत पाठलाग करत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी समोर आली. कुलाबा पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवत आरोपीला तत्काळ अटक केली. नुरेन मोहम्मद खालिद (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गोवंडीचा रहिवासी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला खालिद कपडे शिलाईचे काम करतो. गेल्या चार महिन्यांपासून तो मुंबईत आला आहे. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास परदेशी महिलेचा खालिदने कुलाब्यातील घरापर्यंत पाठलाग करत अश्लील चाळे केले. महिलेने घाबरून आतून दरवाजा लावून घेताच आरोपीने बाहेरून दरवाजाची कडी लावली. घडलेला प्रकार मैत्रिणीच्या कुटुंबीयांना सांगताच त्यांनाही धक्का बसला. तिला तक्रार देण्यासाठी सांगताच तिने नकार दिला. अखेर मैत्रिणीच्या मुलाने पोलिसांत धाव घेत घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.
कुलाबा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने खालिदला अटक केली. त्याने अशाच प्रकारे आणखी काही परदेशी पर्यटक महिलांना टार्गेट करत पाठलाग केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीस अधिक चौकशी करत आहेत.