मुंबई - राज्य सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करून रेणू शर्मा या महिलेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, रेणू शर्मा या महिलेने पोलीस ठाण्यात अजून एका व्यक्तिविरोधात तक्रार दाखल केली होती असे निष्पन्न झाले आहे. प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिल्या प्रकरणी रेणू शर्मा हिने २०१९ मध्ये ही तक्रार दिली होती.रेणू शर्मा हिने रिझवान इस्ताक शेख या व्यक्तिविरोधात ही तक्रार दिली होती. जून २०१८ पासून आजपर्यंत रिझवान शेख याने माझ्याशी मैत्री करून प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच शाररिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणून मानसिक त्रास दिला. तसेच पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असा आरोप रेणू शर्मा हिने केला आहे. या प्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५४ (क) ३ अन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, ही कागदपत्रे आज प्रसारमाध्यमांच्या हाती लागली आहेत. तर रिझवान कुरेशी यानेही रेणू शर्मा हिने आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.