महिलेची धिंड काढणारे पाच जण ताब्यात, वरिष्ठांकडे तक्रार केल्याने पोलिसांकडून शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 06:22 IST2025-01-19T06:21:59+5:302025-01-19T06:22:37+5:30
शनिवारी पोलिसांनी जामूनकरसह अन्य चौघांना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा व जादूटोणा’ अधिनियमाचे कलम ३ समाविष्ट करण्यात आले.

महिलेची धिंड काढणारे पाच जण ताब्यात, वरिष्ठांकडे तक्रार केल्याने पोलिसांकडून शिवीगाळ
- नरेंद्र जावरे
चिखलदरा (जि. अमरावती) : रेट्याखेडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून ७७ वर्षीय काळमी शेलूकर यांची धिंड काढून अघोरी छळ करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली. यात मारहाणीचा गुन्हा दाखल असलेला आरोपी बाबू जामूनकर हा तेथील पोलिस पाटील व माजी सरपंच असल्याचे उघड झाले. शनिवारी पोलिसांनी जामूनकरसह अन्य चौघांना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात ‘नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा व जादूटोणा’ अधिनियमाचे कलम ३ समाविष्ट करण्यात आले.
कुटुंबीयांचा आरोप
पीडितेला मूत्र पाजले, चटके देण्यात आले. सुनेने ६ जानेवारीला रात्री तक्रार नोंदविली. धिंड काढल्याची माहिती देऊनही ती एफआयआरमध्ये समाविष्ट केली नाही, असा कुटुंबाचा आरोप आहे.
राज्यभर खळबळ
‘लोकमत’ने १८ जानेवारीला महिलेवरील अघोरी छळाचे वृत्त प्रकाशित करताच राज्यभर खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक आनंद यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन कारवाईची हमी दिली.
‘ती’ १८ दिवसांनंतर गावी
गावात काळमी शेलूकर यांना ३० डिसेंबरला धिंड काढून मारहाण झाली. डोक्यावर गाठोडे बांधून त्यांना गावाबाहेर हाकलण्यात आले. तेव्हापासून १८ दिवसांनंतर शनिवारी त्या सून व मुलासोबत गावी आल्या.
मुलास पोलिसाचा फोन
जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना तक्रार केली म्हणून एका पोलिसाने शेलूकर यांच्या मुलास शनिवारी सकाळी फोन करून प्रचंड शिवीगाळ केली.
आरोपी पोलिस पाटील असल्याने
त्याला पदमुक्त करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलू. पाच आरोपींना ताब्यात घेतले. मूळ गुन्ह्यात कलम वाढ करण्यात आली आहे.
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक