पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 15:03 IST2025-07-07T15:02:10+5:302025-07-07T15:03:19+5:30

Crime News : पतीसोबत १३ वर्षांच्या संसारानंतर लिंडा स्टर्मरने अतिशय भयानक पाऊल उचलले.

First she set her husband on fire, then she ran him over with a car, even breaking his ribs! Why was the wife so cruel? | पतीला आधी पेटवून दिलं, मग गाडीनं उडवलं, बरगड्याही मोडल्या! पत्नी इतकी क्रूर का झाली?

AI Generated Image

गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत. आता अमेरिकेतूनही अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मिशिगनमध्ये राहणाऱ्या एका पत्नीने आधी आपल्या घरात आग लावली आणि नंतर पतीला गाडीने उडवलं. यामध्ये पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिशिगनमध्ये राहणाऱ्या लिंडा स्टर्मर नावाच्या महिलेने आपला पती टॉड स्टर्मर याच्यासोबत हे क्रूर कृत्य केले आहे. अनैतिक संबंध आणि पैशांवरून झालेला वाद इतका विकोपाला गेला की, लिंडाने सगळ्या मर्यादा ओलांडल्या.

आपल्या पतीसोबत १३ वर्षांच्या संसारानंतर लिंडा स्टर्मरने अतिशय भयानक पाऊल उचलले. रिपोर्ट्सनुसार, लिंडाचे तिच्या ऑफिसमधील एका ट्रक ड्रायव्हरसोबत अफेयर होते. यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा पैसे आणि या नातेसंबंधांवरून वाद होत असत.

१३ वर्षांपासून होते एकत्र!
टॉड आणि लिंडा स्टर्मर १३ वर्षांहून अधिक काळ एकत्र होते. त्यांची पहिली भेट १९८९मध्ये झाली होती. त्यावेळी लिंडा एक सिंगल मदर होती आणि दोन लहान मुलींसोबत घटस्फोटाच्या प्रक्रियेतून जात होती. ९०च्या दशकाच्या सुरुवातीला लग्न करण्यापूर्वीच या जोडप्याला दोन मुले झाली. मात्र, २००७ पर्यंत त्यांचे लग्न तुटायला लागले, कारण लिंडाचे तिच्या ऑफिसमधील एका ट्रक ड्रायव्हरसोबत प्रेमसंबंध होते. 

काय होता प्रकार?
ही घटना जानेवारी २००७ची आहे. लिंडा आणि टॉड यांच्यात जोरदार भांडण झाले. दुसऱ्या दिवशी लिंडाने अचानक संपूर्ण घराला आग लावली. जेव्हा अग्निशमन दलाचे जवान घरात पोहोचले, तेव्हा त्यांनी पाहिले की, संपूर्ण घर जळून खाक झाले होते. टॉड गंभीर जखमी झाला होता आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांच्या तपासात उघड झाले की, टॉडच्या डोक्यावर आणि शरीरावर गंभीर जखमा होत्या. त्यांच्या शरीरावर पेट्रोलसारखे ज्वलनशील पदार्थ देखील सापडले, म्हणजेच कोणीतरी जाणूनबुजून आग लावली होती. इतकेच नाही, तर लिंडा ज्या व्हॅनमधून पळून जात होती, त्यावरही रक्ताचे डाग आढळले. नंतर असे उघड झाले की, तिने स्वतः आपल्या पतीला त्या व्हॅनने चिरडले होते.

स्वतःला वाचवण्यासाठी केला बनाव!

लिंडाची चौकशी केली असता, तिने सांगितले की तिला टॉडची किंकाळी ऐकू आली आणि तिला दिसले की, दिवाणखान्यात आग लागली होती. ती समोरच्या दारातून बाहेर धावली आणि व्हॅनमध्ये बसली, तिला माहीत होते की चाव्या आत आहेत, आणि टॉड तिचा पाठलाग करेल. ९११वर कॉल करण्यासाठी आपला मोबाइल घेऊ शकली नाही, असे देखील ती म्हणाली. लिंडाने यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेक बनाव केले.

अखेर गुपित उघड, कोर्टाने सुनावली जन्मठेप!
२००९मध्ये लिंडावर हत्या आणि आग लावल्याचा गुन्हा दाखल झाला. तिची मुले तिच्या विरोधात उभी राहिली, पण मुलींनी तिला साथ दिली. कोर्टात तिच्या जुन्या मित्रानेही साक्ष दिली की, लिंडा नेहमी म्हणायची की, "मला पतीपासून सुटका करून घ्यायची आहे, त्याला गाडीने चिरडेन." २०१०मध्ये कोर्टाने लिंडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, तिने वारंवार अपील केले. २०१८मध्ये तिची शिक्षा रद्द करण्यात आली आणि पुन्हा खटला चालवला गेला. शेवटी, ६० वर्षीय लिंडाला पुन्हा हत्येचा दोषी ठरवण्यात आले आणि तिला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले.

Web Title: First she set her husband on fire, then she ran him over with a car, even breaking his ribs! Why was the wife so cruel?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.