Woman Jumps with Child: जिने जन्म दिला, तिनेच मृत्यूच्या दारात ढकललं. एका दोन वर्षाच्या मुलाला आईने १३व्या मजल्यावरून खाली फेकले. त्यानंतर स्वतःही उडी मारून आत्महत्या केली. गुजरातमधील सुरत शहरात बुधवारी ही घटना घडली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज गुरुवारी समोर आले.
पूजा असे मयत महिलेचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. आई आणि मुलाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले होते.
गणपती बसवलेल्या जागेपासून २० फुटांवर पडले होते मृतदेह
पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, ज्या जागेवर ही घटना घडली, ती गणपती बसवलेल्या ठिकाणापासून २० फूट अंतरावर होती. १३व्या मजल्यावरून २ वर्षाच्या मुलाला फेकले, त्यानंतर आईनेही उडी मारली. तरीही बाजूच्या गणपती मंडळात असलेल्या लोकांना कळले नाही.
सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आई आणि मुलाचा जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह बघितले आणि पोलिसांना माहिती दिली. सुरतमधील अलथाण परिसरात ही घटना घडली आहे.
मुलाला लिफ्टने वरच्या मजल्यावर घेऊन गेली महिला
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज बघितले. त्यातील एकामध्ये महिला लिफ्टने मुलाला वरच्या मजल्यावर घेऊन जाताना दिसत आहे. १३व्या मजल्यावर गेल्यावर महिला दोन वर्षाच्या मुलाला खाली फेकताना दिसत आहे.
मुलगा खाली पडल्यानंतर काही सेंकदाने आईही उडी मारताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. आई आणि मुलाचे मृतदेह जवळच पडलेले होते.
पोलिसांकडून मृत्यूच्या कारणाचा तपास
महिला ज्या कुटुंबातील आहे, ते कुटुंब आर्थिकदृष्ट्या चांगले आहे. त्यामुळे महिलेने मुलाची हत्या करून आत्महत्या का केली? याचे कारण शोधण्याचे काम पोलीस करत आहेत. पोलिसांनी मयत पूजाचा मोबाईल ताब्यात घेतला असून, त्यातील माहितीचे विश्लेषण केले जाणार आहे.