धक्कादायक! पुण्यात सराफा व्यावसायिकावर गोळीबार; हल्लेखोरांनी झाडल्या ६ गोळ्या
By विवेक भुसे | Updated: November 8, 2023 22:55 IST2023-11-08T22:53:06+5:302023-11-08T22:55:55+5:30
सराफाला लागल्या तीन गोळ्या

धक्कादायक! पुण्यात सराफा व्यावसायिकावर गोळीबार; हल्लेखोरांनी झाडल्या ६ गोळ्या
पुणे : दिवाळीच्या सुमारास दुकानातील सोने चांदी घेऊन घरी जाणाऱ्या सराफावर दोघा चोरट्यांनी गोळीबार करुन त्यांच्याकडील दागिने हिसकावून नेण्याचा खळबळजनक प्रकार वानवडीतील बी. टी. कवडे रोडवर घडला. ही घटना बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्रदीप मदनलाल ओसवाल (वय ३५, रा. मुंढवा) असे या घटनेत जखमी झालेल्या सराफाचे नाव आहे. त्यांच्या पायावर दोन व तोंडावर एक अशा तीन गोळ्या लागल्या असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रदीप ओसवाल यांचे हडपसरमधील सय्यदनगरमध्ये सराफी दुकान आहे. दिवाळीनिमित्त दुकानात दागिने मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोर ओसवाल यांच्यावर पाळत ठेवून असल्याचा संशय आहे. प्रदीप ओसवाल हे दुकान बंद करुन दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी बी. टी. कवडे रोडवर त्यांना हल्लेखोरांनी अडविले. त्यांच्यावर एका पाठोपाठ एक सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यांच्याजवळील दागिने असलेली बॅग चोरट्यांनी हिसकावून ते पळून गेले. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिकांनी तिकडे धाव घेतली. ओसवाल यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विक्रात देशमुख, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सतीश गोवेकर व अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेची माहिती घेत आहे. दिवाळीच्या सुमारास सराफावर हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.