सानपाड्यात ठेक्याच्या वादातून गोळीबार; चार गोळ्या झेलूनही सुदैवाने बचावले राजाराम टोके
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:05 IST2025-01-05T10:05:16+5:302025-01-05T10:05:55+5:30
राजाराम टोके हे एपीएमसी भाजीमार्केटमधील ओला कचरा उचलण्याचा ठेका सांभाळतात

सानपाड्यात ठेक्याच्या वादातून गोळीबार; चार गोळ्या झेलूनही सुदैवाने बचावले राजाराम टोके
लोकमत न्यूज नेटवर्क,
नवी मुंबई : एपीएमसीमधील ओला कचऱ्याचे ठेकेदार राजाराम टोके यांच्यावर झालेल्या गोळीबारामागे एपीएमसीतला वाद असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. चार गोळ्या झेलूनही बचावलेले टोके अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याने ते शुद्धीवर आल्यावर पोलिसांच्या तपासाला येणार वेग येणार आहे.
एपीएमसी भाजीमार्केटमधील ओला कचरा उचलण्याचा ठेका सांभाळणारे राजाराम टोके यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी सानपाडामध्ये घडली. घटनेनंतर सीसीटीव्हीच्या तपासात दुचाकीवरून आलेल्या दोघांची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यावरून सुपारी देऊन हा हल्ला घडवला गेला असल्याचा व हल्ल्यामागे एपीएमसीमधील ठेक्याच्या वादाचे संबंध असल्याचाही निष्कर्ष पोलिसांनी लावला आहे. मात्र, हल्ल्याची सुपारी नेमकी दिली कोणी, याचा उलगडा टोके शुद्धीवर आल्यावर किंवा हल्लेखोर भेटल्यानंतर होणार आहे.
शनिवारी पहाटे दोनच्या सुमारास टोके यांच्यावरील सर्व शस्त्रक्रिया पुन्हा झाल्या असून, त्यांचे प्राण वाचले आहेत. मात्र, ते अद्याप बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांचा जबाब घेतलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हल्लेखोरांच्या शोधासाठी राज्यात व राज्याबाहेर पोलिसांची काही पथके पाठवली आहेत.