आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2018 17:11 IST2018-12-22T17:03:57+5:302018-12-22T17:11:43+5:30
दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला

आंबेठाणमध्ये केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूलने खुनी हल्ला
चाकण : दोन गाड्यांच्या झालेल्या अपघातात गाडीची नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून आंबेठाण ( ता. खेड ) येथे एकाने केटरिंग व्यावसायिकावर गावठी पिस्तूल मधून जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेत चुलत भाऊ मोठ्याने ओरडल्याने पिस्टलमधील गोळीचा हवेत फायर झाल्याने सुदैवाने एकाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी ( दि. २२ ) गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी (दि. २१) रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास आंबेठाण गावात घडली. याबाबत शांताराम दत्तात्रय चव्हाण (वय ३३ वर्षे, केटरिंग व्यवसाय, रा.आंबेठाण, राम मंदिरा शेजारी, ता. खेड, जि. पुणे ) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी निलेश उर्फ जगु नवनाथ मांडेकर (वय २६ वर्षे, रा. आंबेठाण, चाकण, ता. खेड ) याला अटक करण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी कि, आरोपी निलेश उर्फ जग्गू नवनाथ मांडेकर हा दिनांक २१/ १२/ २०१८ रोजी रात्री ८/५० वा. चे सुमारास फिर्यादी चव्हाण यांचा मावसभाऊ शांताराम गाडे यांचा मित्र राजू मोहिते यांच्या फोर्ड गाडी (एमएच १४ - एफएम - ९१५९ ) व आरोपी मांडेकर यांची ईरटीगा गाडी (एमएच-१४. ६०३४ ) या दोन गाड्यांचा अपघात झाला. या अपघातात झालेल्या आरोपीच्या गाडीचे नुकसान भरपाई मिळू न दिल्याचा राग मनात धरून मांडेकर याने गावठी कट्टा हा फिर्यादी चव्हाणच्या डोक्यास लावला. त्यावेळी फिर्यादीचे सोबत असणारे चुलत भाऊ गणेश चव्हाण मोठ्याने ओरडल्याने फिर्यादीने आरोपीच्या हाताला धक्का दिल्याने पिस्टलमधून गोळी हवेत फायर झाली. आरोपीच्या हातातून गावठी कट्टा हिसकावून घेत असताना आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीला अटक करण्यात आली असून खेड न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलीस नाईक एस.ए. मापारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनिरीक्षक पासलकर हे पुढील तपास करीत आहेत.