लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:29 IST2020-04-29T15:27:58+5:302020-04-29T15:29:30+5:30
दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाने वडिलांवर काठीने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले.

लॉकडाऊनमध्ये कुटुंबावर आली बेताची स्थिती, कलहातून बेरोजगार मुलाने केली वडिलांची हत्या
मुंबई - रविवारी भांडुप येथे वडिलांची मुलाच्या हातून हत्या झाली आहे. लॉकडाऊनमध्ये घरातील खर्चाबाबत दोघांमध्ये वाद सुरू होता. वडील रुग्णालयात काम करत असताना आणि संपूर्ण घराचा खर्च चालवत असताना मुलगा बेरोजगार आहे. लॉकडाऊनमुळे त्याला कोणतीही नोकरी मिळत नव्हती. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर मुलाने वडिलांवर काठीने हल्ला केला व त्यांना गंभीर जखमी केले. नंतर त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय कृष्णा गोरीवाले हे सुभाष नगरातील म्हाडा कॉलनीमध्ये आपल्या कुटूंबासह राहत होते. त्यांचा मुलगा सचिन हा कधीकधी घरातील खर्चासाठी थोडीफार कामे करायचा, मात्र लॉकडाऊननंतर त्याचे उत्पन्न पूर्णपणे बंद झाले. वडिल रुग्णालयात नोकरी करत होते.
शुक्रवारी कृष्णा गोरीवाले रुग्णालयातून कामावर परतले. सचिन नोकरी न मिळाल्याने गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. भांडुप येथील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सचिनच्या नोकरीबाबत वडील आणि सचिन यांच्यातील वाद होता. भांडणानंतर सचिनने त्याच्या वडिलांच्या पाय, पाठीवर आणि डोक्यावर हल्ला केला. त्यावेळी जखम फारशा गंभीर दिसत नव्हत्या. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकजण शांतपणे झोपायला गेला. दुसर्या दिवशी गोरीवालेची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्यांना दवाखान्यात आणले. येथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी पुढे सांगितले की, पोस्टमॉर्टमवरून असे दिसून आले की गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. मुलाविरूद्ध भारतीय दंड संहिता कलम 302 (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यालाही कोर्टात हजर केले असता कोर्टाने २९ एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली.