Yo Yo Honey Singhसोबत शोदरम्यान दिल्ली क्लबमध्ये हाणामारी, FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 14:44 IST2022-04-07T14:11:10+5:302022-04-07T14:44:00+5:30
Yo Yo Honey Singh manhandled at South Delhi club : या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे.

Yo Yo Honey Singhसोबत शोदरम्यान दिल्ली क्लबमध्ये हाणामारी, FIR दाखल
नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये शो करण्यासाठी आलेला गायक यो यो हनी सिंगसोबत गैरवर्तन आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 27 मार्च रोजी दक्षिण दिल्लीतील एका क्लबमध्ये गायक यो यो हनी सिंगवर कथित हल्ला करण्यात आल्यानंतर चार ते पाच अज्ञात लोकांच्या गटाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आता एफआयआर नोंदवला आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, यो यो हनी सिंग आणि त्याचे वकील इशान मुखर्जी यांनी २८ मार्च रोजी 'उपद्रव, गैरवर्तन आणि धमकावल्याची तक्रार केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना 27 मार्च रोजी स्कॉल क्लब, साउथ एक्स्टेंशन-2 येथे घडली. एफआयआरनुसार, यो यो हनी सिंग 26 आणि 27 मार्चच्या मध्यरात्री क्लबमध्ये परफॉर्म करण्यासाठी आला होता. त्यानंतर 27 मार्चच्या रात्री शो सुरू असताना चार-पाच जणांच्या टोळक्याने जबरदस्तीने स्टेजवर चढून कलाकारांशी झटापट सुरू केली.
एफआयआरमध्ये म्हटले आहे, “4-5 अज्ञात लोकांनी स्टेजवर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली आणि कार्यक्रमात व्यत्यय आणला. पूर्ण शोमध्ये त्याने बिअरच्या बाटल्या दाखवल्या आणि कलाकारांना धक्काबुक्की करून स्टेजवरून ढकलले. त्यानंतर चेक शर्ट घातलेल्या एका माणसाने माझा (हनी सिंग) हात पकडला आणि मला पुढे ओढायला सुरुवात केली. मी ते टाळण्याचा प्रयत्न करत होतो, पण तो माणूस मला आव्हान देत होता आणि धमक्या देत होता. त्यांच्याकडे एक शस्त्र असल्याचेही मी पाहिले. लाल शर्ट घातलेला आणखी एक माणूस व्हिडिओ बनवत होता आणि म्हणत होता 'भगा दिया हनी सिंग को.'
हनी सिंगसह सर्व कलाकारांनी स्टेज रिकामा केला आणि परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन हनी सिंगला मध्येच कार्यक्रम सोडावा लागला, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी हेतुपुरस्सर दुखापत करणे, गुन्हेगारी धमकी देणे आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अद्याप हनी सिंग किंवा त्याच्या वकिलाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.