पित्यानेच पोटच्या १० वर्षीय मुलाला संपवले, सावकारी जाचाला कंटाळून सामूहिक आत्महत्येचे प्रकरण
By नारायण बडगुजर | Updated: January 19, 2025 19:00 IST2025-01-19T19:00:13+5:302025-01-19T19:00:38+5:30
खून प्रकरणी गुन्हा दाखल, पित्याने पोटच्या १० वर्षीय मुलाचा खून केला. त्यानंतर गळफास घेऊन त्याने पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा मृत्यू झाला.

पित्यानेच पोटच्या १० वर्षीय मुलाला संपवले, सावकारी जाचाला कंटाळून सामूहिक आत्महत्येचे प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सावकारी जाचाला कंटाळून कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केल्याचा प्रकार चिखली येथे शुक्रवारी (दि. १७) घडला. यामध्ये पित्याने पोटच्या १० वर्षीय मुलाचा खून केला. त्यानंतर गळफास घेऊन त्याने पत्नीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. यात पत्नीचा मृत्यू झाला.
धनराज वैभव हांडे (१०), असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. वैभव मधुकर हांडे (५०, रा. सोनवणे वस्ती, चिखली) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. सहायक पोलिस निरीक्षक गणेश बाळकृष्ण खारगे यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १८) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव हांडे याचे औषधांचे (मेडिकल) दुकान आहे. त्याने काही जणांकडून कर्ज घेतले होते. कर्ज वसुलीसाठी संबंधित व्यक्तींनी तगादा लावला. तसेच वैभव याला शिवीगाळ करून धमकी दिली. या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याने शुक्रवारी सायंकाळी मुलगा धनराज याचा गळा आवळून खून केला. त्यानंतर झोपेच्या गोळ्या घेऊन वैभव आणि त्याची पत्नी शुभांगी (वय ३६) या दोघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यात गळफास घेतलेल्या शुभांगीचा मृत्यू झाला.
दरम्यान, वैभव आणि शुभांगी यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला नातेवाईकाकडे मुंबई येथे पाठवले होते. या मोठ्या मुलाच्या मोबाइल फोनवर वैभव याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी मेसेज पाठविला. त्यामध्ये सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद होते. त्यावरून आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत माहिती मिळताच चिखली पोलिसांनी वैभव हांडे याच्या घरी धाव घेतली. त्यावेळी वैभव हा जिवंत असल्याचे निदर्शनास आले. त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, गळफास घेतलेल्या शुभांगी व धनराज यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा दाखल
शुभांगी व धनराज यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. गळा आवळून, गुदमरून धनराज याचा मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. त्यावरून पोलिसांनी वैभव याला ताब्यात घेतले. धनराज याचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी वैभव हांडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.