दोन मुलांची हत्या केलीय, आता मी आत्महत्या करतोय! जावयाचा सासऱ्यांना कॉल, अन् मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:49 IST2022-05-11T20:47:49+5:302022-05-11T20:49:58+5:30
पतीनं केली दोन मुलांची हत्या; सासऱ्यांना कॉल करून गळफास घेतला

दोन मुलांची हत्या केलीय, आता मी आत्महत्या करतोय! जावयाचा सासऱ्यांना कॉल, अन् मग...
चक्रधरपूर: झारखंडच्या चक्रधरपूरात एका पित्यानं त्याच्याच २ मुलांची हत्या केली. मुलांना मारहाण करून त्यांना गळा दाबून संपवल्यानंतर वडिलांनी गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. इंदकाटा गावात ही धक्कादायक घटना घडली. मध्यरात्री हा सगळा प्रकार घडला.
मुलांना संपवणाऱ्या व्यक्तीचं नाव मुकेश महतो असल्याचं पोलिसांनी सांगितलं. १२ वर्षांचा मुलगा संगम आणि ९ वर्षांची मुलगी मानसीची मुकेशनं हत्या केली. त्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली. मुकेशच्या सासऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश पत्नी आणि दोन मुलांसह वऱ्ह्यांड्यात झोपला होता. तो अचानक मध्यरात्री उठला. दोन मुलांना घेऊन एका खोलीत गेला. तिथे त्यानं मुलांना मारहाण सुरू केली. त्यानंतर गळा दाबून दोघांची हत्या केली.
मुलांची हत्या केल्यानंतर मुकेशनं चक्रधरपूरमधील जामिद गावात वास्तव्यास असलेल्या सासऱ्यांना कॉल केला. मी दोन मुलांची हत्या केली आणि आता आत्महत्या करत आहे. सकाळी लवकर येऊन तुमच्या नातवंडांचे मृतदेह घेऊन जा, असं मुकेशनं सासऱ्यांना कॉलवर सांगितलं. त्यानंतर त्यानं लगेच कॉल कट केला. सासऱ्यांनी मुकेशला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फोन स्विच ऑफ होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.