Father kills Son For Insurance Money: पैशाच्या लालसेपोटी नात्यांना किती किंमत असते याचे धक्कादायक चित्र उत्तर प्रदेशाच्या संभळ जिल्ह्यातून समोर आले आहे. मुरादाबाद येथे रस्त्याच्या कडेला सापडलेल्या २९ वर्षीय तरुणाच्या हत्येचा खुलासा करताना पोलिसांनी त्याच्या पित्यालाच मुख्य आरोपी म्हणून अटक केली आहे. तब्बल २ कोटी १० लाख रुपयांच्या अपघात विमा पॉलिसीची रक्कम हडपण्यासाठी पित्यानेच मुलाची क्रूरपणे हत्या घडवून आणली.
संभळ जिल्ह्यातील बहजोई येथील रहिवासी अनिकेत शर्मा याचा मृतदेह १६ नोव्हेंबरच्या रात्री चंदौसी-मुरादाबाद बायपासजवळील जैतपूर गावात एका शेतात आढळला होता. सुरुवातीला हा अपघात असल्याचे वाटत होते, पण शवविच्छेदन अहवालात अनिकेतच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याचे स्पष्ट झाले. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, अनिकेतचा पिता बाबूराम शर्मा पोलिसांना एफआयआर दाखल करण्याऐवजी सतत मुलाचा मृत्यू रस्त्यावरील अपघातामुळे झाल्याचे सांगत होता. त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला.
२.१० कोटींच्या विम्याचे गुपित उघड
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी केली असता, अनिकेतच्या नावावर २ कोटी १० लाख रुपयांची अपघात विमा पॉलिसी असल्याची माहिती मिळाली. हा विमा अनिकेत आणि त्याच्या वडिलांना कोणतीही माहिती न देता काढण्यात आला होता. या मोठ्या रकमेच्या विम्याच्या माहितीनंतर पोलिसांनी बाबूराम शर्मा याला ताब्यात घेऊन चौकशी केली, तेव्हा बापच खुनी असल्याचे उघड झाले.
वकील आणि पित्याचा भयानक सौदा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कटाचा सूत्रधार बाबूराम शर्मा याचा वकील मित्र आदेश कुमार आहे. बाबूराम शर्मा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याची भेट वकील आदेश कुमारसोबत झाली. आदेश कुमारने बाबूरामच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत, बाबूराम आणि अनिकेतला अंधारात ठेवून अनिकेतच्या नावावर टाटा कंपनीची २.१० कोटी रुपयांची अपघात विमा पॉलिसी काढली. एटीएम कार्ड वकिलाने स्वतःकडे ठेवले आणि प्रीमियमही तोच भरत होता.
अनिकेतला दारु पिण्याची सवय असल्याचे कळल्यावर वकिलाने बाबूरामला मुलाची हत्या घडवून आणल्यास २५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले. वकिलाने सांगितले की, विम्याचे पैसे मिळताच निम्मे-निम्मे वाटून घेऊ. बाबूरामने हो म्हटल्यावर वकिलाने साडेतीन लाख रुपयांची सुपारी देऊन अनिकेतच्या हत्येचा कट रचला. हत्येसाठी वकीलाने असलम उर्फ सुलतान याला पैसे दिले. असलमने तहब्बुर मैवाती आणि साजिद मैवाती यांना सोबत घेतले. त्यानंतर १५ नोव्हेंबरच्या रात्री बाबूराम शर्माने स्वतः अनिकेतला बाईकवरून अंडरपासजवळ आणले आणि आरोपींच्या हवाली केले.
आरोपींनी अनिकेतला चंदौसी आणि बिलारी येथे नेऊन भरपूर दारू पाजली. नशेत असताना आरोपींनी एका गावात नेऊन लोखंडी रॉडने अनिकेतच्या डोक्यावर जोरदार वार करून त्याची हत्या केली आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला.
चौघे अटकेत, वकील फरार
पोलिसांनी आरोपी पिता बाबूराम शर्मा, सुपारी किलर असलम उर्फ सुलतान, तहब्बुर मैवाती आणि साजिद मैवाती यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेला लोखंडी रॉड आणि अनिकेतचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. मात्र, या संपूर्ण कटाचा मास्टरमाईंड वकील आदेश कुमार आणि त्याला मदत करणारा त्याचा साथीदार विजयपाल हे दोघे अजूनही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Web Summary : In Uttar Pradesh, a father orchestrated his son's murder for insurance money. He conspired with a lawyer and hired killers to eliminate his son for a 2.1 crore insurance payout. Police arrested the father and accomplices; the lawyer is absconding.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक पिता ने बीमा धन के लिए अपने बेटे की हत्या की साजिश रची। उसने एक वकील के साथ मिलकर 2.1 करोड़ के बीमा भुगतान के लिए अपने बेटे को खत्म करने के लिए हत्यारों को काम पर रखा। पुलिस ने पिता और साथियों को गिरफ्तार किया; वकील फरार है।