शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून, पळून जाणाऱ्या तिघा भावंडांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 05:55 IST2025-01-17T05:53:46+5:302025-01-17T05:55:06+5:30
पोलिसांनी सांगितले, उस्तुरी येथील सुरेश आण्णेप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

शेतीच्या वादातून बाप-लेकाचा खून, पळून जाणाऱ्या तिघा भावंडांना अटक!
- आशपाक पठाण
कासारसिरसी (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील उस्तुरी येथे शेतीच्या वादातून सख्या तीन भावंडांनी संगनमत करून बाप लेकाचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या घडली. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. रात्री ११:३० वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण राठोड यांनी दिली.
पोलिसांनी सांगितले, उस्तुरी येथील सुरेश आण्णेप्पा बिराजदार (वय ५०) यांचा त्यांच्या भावंडासोबत वडिलोपार्जित शेतीचा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सुरेश बिराजदार व त्यांचा मुलगा गणेश व साहील हे तिघेजण शेतात काम करीत असताना आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांनी संगनमत करून अचानक शेतात येऊन लाठी-काठी व दगडाने मारहाण सुरू केली.
या घटनेत सुरेश बिराजदार यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगा साहिल (वय २२) यांचा कासार सिरसी ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा मुलगा गणेश बिराजदार हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मृत सुरेश बिराजदार यांना एकूण चार भाऊ होते; त्यांतील एक भाऊ मृत आहे. घटना घडल्यानंतर तिन्ही आरोपी पळून जात असताना पोलिस उपनिरीक्षक अजय पाटील, पो.हे.कॉ. ज्ञानोबा सिरसाट, राजू हिंगमिरे, पोलिस शिपाई मस्के, गायकवाड यांनी मोठ्या शिताफीने त्यांना तासाभरातच अटक केली आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राठोड तपास करीत आहेत.
तासाभरात तिघांना घेतले ताब्यात
सहायक पोलिस निरीक्षक राठोड म्हणाले, शेतीच्या वादातून ही घटना घडली आहे. यात बाप-लेकाचा मृत्यू आहे. या प्रकरणी आरोपी बसवराज बिराजदार, सुनील बिराजदार व लखन बिराजदार यांना घटनेनंतर तासाभरातच अटक केली आहे. सध्या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.