जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर; मालाडमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 02:15 AM2019-11-01T02:15:58+5:302019-11-01T02:16:08+5:30

क्षुल्लक कारण निमित्त झाले

Fatal attack kills husband, wife serious; Events in Malad | जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर; मालाडमधील घटना

जीवघेण्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर; मालाडमधील घटना

Next

मुंबई : घरासमोर नैसर्गिक विधी केल्याबाबत जाब विचारणे एका कुटुंबाच्या जीवावर बेतले. शेजाऱ्यांनी धारदार शस्त्राने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले. यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नीची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.

नंदलाल कनोजिया (४५) आणि त्यांची पत्नी ऊर्मिला (४०) यांच्यावर गुरुवारी हा हल्ला करण्यात आला. कनोजिया हे गोरेगाव पश्चिमेतील वासरी हिल परिसरात इस्त्रीचे दुकान चालवत होते. त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून, १८ वर्षांचा मुलगा शिकत आहे. कनोजिया यांच्या घरासमोरच्या खोलीत रिक्षाचालक असणारे हल्लेखोर इसम भाडेतत्त्वावर राहात होते. कनोजिया आणि त्यांच्यात क्षुल्लक कारणावरून खटके उडायचे.

ऊर्मिला गुरुवारी पहाटे चारच्या सुमारास पाणी भरायला उठल्या होत्या. त्या घराबाहेर आल्या तेव्हा हल्लेखोरांपैकी एक त्यांच्या भिंतीवर लघुशंका करताना त्यांना दिसला. त्यांनी जाब विचारला तेव्हा त्याने आणि त्याच्या अन्य साथीदाराने हुज्जत घातली. ते ऐकून कनोजिया बाहेर आले. त्यांच्यासोबतही या दोघांनी शिवीगाळ करीत भांडण सुरूच ठेवले. दरम्यान त्यातल्या एकाने कनोजिया यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. ऊर्मिला यांनी पतीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनाही त्याने जखमी केले. आरडाओरड झाल्याने स्थानिक घटनास्थळी जमले. ते पाहून हल्लेखोर व साथीदार स्थानिकांवरही हल्ला करत रिक्षात बसून पळाले. स्थानिकांनी कनोजिया व त्यांच्या पत्नीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र कनोजिया यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेतील ऊर्मिला यांना नायर रुग्णालयात हलविले.

आरोपी सीसीटीव्हीत कैद
कनोजियांवर हल्ला करणारे रिक्षात बसून आरे चेकनाकापर्यंत पळाले. तिथे त्यांनी रिक्षा सोडली आणि जंगल परिसरात पळून गेले. रिक्षा तपास अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली आहे. दोन्ही आरोपींचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्यांना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

Web Title: Fatal attack kills husband, wife serious; Events in Malad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून