काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:18 IST2025-07-17T06:17:59+5:302025-07-17T06:18:07+5:30

- जितेंद्र कालेकर लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : काैटुंबिक कलहामुळे अनेकवेळा मुलांना घरात मारहाणीच्या घटना ठाणे शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडल्या ...

Family feud leads to killing of young children; Girl kidnapped in Badlapur; Mother becomes cruel in Mumbra | काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर

काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर

- जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काैटुंबिक कलहामुळे अनेकवेळा मुलांना घरात मारहाणीच्या घटना ठाणे शहर आयुक्तालयाच्या क्षेत्रात घडल्या आहेत. बदलापुरात एका कुटुंबीयांशी झालेल्या वादातून मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने नुकतीच अटक केली. तर, मुंब्य्रात पहिल्या पतीपासून विभक्त झालेल्या महिलेने केवळ मोबाइलसाठी स्वत:च्याच अल्पवयीन मुलीला स्टीलच्या उलथण्याने अमानुष मारहाण केल्याचाही प्रकार समोर आला. केवळ क्षुल्लक कारणासाठी संतापाच्या भरात या मुलीला अमानुषपणे मारहाण झाली. या दोन्ही घटनांचा तपास करणाऱ्या पोलिसांनीही या क्रूरतेबद्दल खेद व्यक्त केला.

बदलापूरच्या रामटेकडी भागातील एका मजूर कुटुंबातील चार वर्षांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यात २४ जूनला दाखल झाली होती. उल्हासनगरचे पोलिस उपायुक्त सचिन गोरे आणि गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेने केलेल्या तपासात एका रिक्षातून या मुलीला रंजित धुर्वे याने रेल्वे स्टेशनच्या दिशेने नेल्याची माहिती एका महिलेकडून मिळाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उल्हासनगर युनिट ४ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी आणि सहायक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी यांच्या पथकाने मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील उमरेठ गावातून २५ जूनला रंजितला ताब्यात घेतले. मुलीच्या कुटुंबीयांशी आदल्या दिवशी झालेल्या वादातून हा अघोरी प्रकार केल्याची कबुली त्याने दिली. त्याला या मुलीच्या आईने जेवण न दिल्याचा रागही त्याच्या डाेक्यात हाेता. यातून ताे मुलीला थेट मध्य प्रदेशातील त्याच्या बहिणीकडे साेपविणार हाेता, असेही त्याने सांगितले.

मोबाइल सायलेंटवर गेल्याने चोप 
दुसऱ्या घटनेत साडेचार वर्षांच्या मुलीने मोबाइल घेतल्याने तो सायलेंटवर गेल्याच्या रागातून तिला स्टीलच्या उलथण्याने अमानुष मारहाण करणाऱ्या आईविरोधात मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलीला जमिनीवर आपटून बेदम मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

त:च्याच मुलीला मारहाण करणारी ही महिला मुंबईतील वडाळा भागात पती, सासू आणि मुलीसह वास्तव्याला होती. ती काही महिन्यांपूर्वी त्याच भागातील दुसऱ्याच व्यक्तीसोबत दिव्यातील साबेगाव भागात वास्तव्याला आली. त्याच्याशी तिने लग्नही केले. काही दिवसांनी तिने तिच्या साडेचार वर्षांच्या मुलीलाही सोबत नेले. दरम्यान, ६ जुलैला सकाळी ११ च्या सुमारास या मुलीला उलथण्याने अमानुषपणे मारहाण होत असल्याची माहिती मुलीच्या आजीला मिळाली. त्याबाबतचे चित्रणही तिला मिळाले. 

मुलीची आईच तिला जमिनीवर आपटत तिचे केस ओढत बेदम मारहाण करीत होती. मुलीच्या सावत्र भावंडांनीही तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. १७ वर्षीय सावत्र भावाने व्हिडीओही काढला. हीच माहिती आजीकडून मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मुलीची तिच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात सासूने सुनेविरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनेकवेळा कुटुंबातील पती पत्नीच्या वादातूनही मुलांना नाहक मारहाण केली जाते. पालकांनी संयमाने मुलांशी वर्तणूक करणे अपेक्षित असल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Family feud leads to killing of young children; Girl kidnapped in Badlapur; Mother becomes cruel in Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.