Fake TATA Salt in Market: टाटावर विश्वास ठेवून मीठ खरेदी केलेय? बनावटही असू शकते, पाच महिन्यांपासून हजारो क्विंटल मीठ बाजारात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 21:58 IST2022-11-23T21:57:55+5:302022-11-23T21:58:23+5:30
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर औद्योगिक क्षेत्रात बनावट टाटा नमक बनविणारी फॅक्टरीला आज सील ठोकण्यात आले.

Fake TATA Salt in Market: टाटावर विश्वास ठेवून मीठ खरेदी केलेय? बनावटही असू शकते, पाच महिन्यांपासून हजारो क्विंटल मीठ बाजारात
उत्तर प्रदेशच्या गाझीपूर औद्योगिक क्षेत्रात बनावट टाटा नमक बनविणारी फॅक्टरीला आज सील ठोकण्यात आले. ज्या टाटा ब्रँडवर विश्वास ठेवून देशातील करोडो लोक टाटा सॉल्ट खरेदी करतात त्यांच्याकडे हे बनावट मीठ येण्याची दाट शक्यता आहे. फॅक्टरीमधून मुख्यमंत्र्यांच्या छापेमारी टीमने २४५ क्विंटल एवढ्या मोठ्या प्रमाणावर मीठ जप्त केले आहे.
हे मीठ टाटा सॉल्टचे लेबल लावून बाजारात विकण्याची तयारी सुरु होती. जुलै महिन्यापासून ही फक्टरी येथे टाटाच्या नावे मीठ बनवत होती. पथकाच्या तक्रारीनुसार डबुआ पोलीस ठाण्यात फॅक्टरी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा मालक फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. कपिल मित्तल असे या मालकाचे नाव आहे.
सीएम फ्लाइंगचे डीएसपी राजेश चेची यांनी सांगितले की, गाजीपूर औद्योगिक परिसरात असलेल्या राधा स्वामी सत्संग आश्रमाजवळ बनावट मीठ तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाली होती. टिन शेडमध्ये चालणाऱ्या कारखान्यात टाटा सॉल्टच्या लेबलच्या पॅकेटमध्ये मीठ भरले जात होते. सोबतच बाजारपेठेत त्याचा पुरवठा केला जात आहे.
यावेळी पथकाने मजुरांची चौकशी केली. बल्लभगढ येथील रहिवासी कपिल मित्तल हा कारखान्याचा मालक आहे. मालकाच्या सांगण्यावरून पाकिटात मीठ भरत असल्याचे त्यांनी सांगितले. मिठाच्या पॅकेटवर छापलेल्या बॅच नंबरमध्ये कर्नालचा पत्ता देण्यात आला होता. घटनास्थळावरून टाटा सॉल्ट सॉल्ट आणि फेना सर्फचे प्लास्टिक रोलही जप्त करण्यात आल्याचे डीएसपींनी सांगितले.