पोलिसांचे अपयश, शाळकरी मुलाच्या हत्याप्रकरणातील मारेकरी ५ दिवसानंतरही मोकाट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 23:28 IST2022-08-30T23:26:30+5:302022-08-30T23:28:39+5:30
२६ ऑगस्ट रोजी नायगाव येथील उड्डाणपूलाच्या खाली पोलिसांना एका बॅंगेत एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता

पोलिसांचे अपयश, शाळकरी मुलाच्या हत्याप्रकरणातील मारेकरी ५ दिवसानंतरही मोकाट
नालासोपारा (मंगेश कराळे) :- अंधेरीतील १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या करून फरार झालेल्या दोन्ही आरोपींना पकडण्यात वालीव पोलिसांना अपयश आले आहे. घटनेला ५ दिवस उलटून गेले तरी हे दोन्ही मारेकरी पोलिसांना सापडलेले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी या मारेकर्यांची रेखाचित्रे काढून ती प्रसारीत केली आहेत.
२६ ऑगस्ट रोजी नायगाव येथील उड्डाणपूलाच्या खाली पोलिसांना एका बॅंगेत एका १५ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता. शाळेच्या बॅचवरून तिची ओळख पटली होती. हा मृतदेह अंधेरीत राहणार्या १५ वर्षीय मुलीचा होता. तिचा प्रियकर संतोष मकवाना (२१) आणि त्याचा मित्र विशाल आंबवणे (२१) या दोघांनी तिची चाकूचे वार करून हत्या केल्याचे त्याच दिवशी निष्पन्न झाले होते. पोलिसांनी हत्येसाठी वापरेला चाकू, बॅग जप्त केले. आरोपींची ओळख पटली मात्र ते पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. या दोन्ही आरोपींनी मृतदेहाची बॅग ट्रेन मधून नायगावला आणली आणि तेथून ते विरारला गेले आणि पुढे गुजराथळा फरार झाली. वालीव पोलिसांचे एक पथक गुजराथला रवाना झाले आहे. मात्र त्यांना अद्याप या आरोपींना पकडता आले नाही.
मोबाईल नसल्याने माग थांबला
या मुलीची हत्या विशालच्या जुहू येथील निवासस्थानी करण्यात आली होती. त्याचवेळी या दोन्ही आरोपींनी पोलिसांना चकमा देण्यासाठी आपला मोबाईल फोन बंद केला होता. त्यांच्याकडे मोबाईल नसल्याने ते कुठे गेले त्याची माहिती पोलिसांना मिळू शकलेली नाही आणि पुढील तपास थांबला आहे. दरम्यान पोलिसांनी या दोन्ही आरोपींची रेखाचित्रे प्रसिध्द केली आहेत.