खळबळजनक! घाटकोपरमध्ये भरदिवसा धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 13:33 IST2019-05-20T18:48:28+5:302019-05-21T13:33:34+5:30
हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बबलू दुबे आहे.

खळबळजनक! घाटकोपरमध्ये भरदिवसा धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात
मुंबई - मुंबई उपनगरातील घाटकोपर परिसरात आज सकाळी एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. भररस्त्यात भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे घाटकोपर परिसरात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार घाटकोपर मेट्रो स्थानकापासून काही अंतरावरच असलेल्या सर्वोदय रुग्णालयाच्या परिसरात हा प्रकार घडला. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बबलू दुबे आहे. या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
आज सकाळी ११. ३० वाजताच्या सुमारास रिक्षेतून आलेल्या तीन जणांनी बबलू दुबेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या तिघांनीही तोंडावर मास्क घातले असल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही. हल्ला करून हे तिघेही घटनास्थळावरून फरार झाले. यानंतर बबलू दुबे यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे. या घटनेनंतर घाटकोपर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपास सुरु आहे. मात्र, दुबेविरोधात टिळकनगर, घाटकोपर आणि पंत नगर पोलीस ठाण्यात हत्येसह अनेक गुन्हे दाखल आहेत. वैयक्तिक वादातून ही हत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, याप्रकरणी जो व्हिडीओ सोशल मीडियावर गोळीबाराचा व्हिडीओ वायरल करण्यात आला तो दिल्लीतील घटनेतील असल्याची माहिती सूत्रांनी दिली.