इस्टेट एजंट बनला साखळी चोर; लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी मार्ग अवलंबिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 11:40 PM2020-07-01T23:40:45+5:302020-07-01T23:43:49+5:30

लॉकडाऊन काळात आर्थिक नुकसान झाल्याने अनेकजण अडचणीत आले आहे.

Estate agent became Chain thief, lockdown led to a criminal route | इस्टेट एजंट बनला साखळी चोर; लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी मार्ग अवलंबिला

इस्टेट एजंट बनला साखळी चोर; लॉकडाऊनमुळे गुन्हेगारी मार्ग अवलंबिला

Next
ठळक मुद्देसमर्थ पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेकांची आर्थिक कोंडी झाल्याने काही जणांनी गळफास जवळ केला तर काहींनी पर्यायी कामाचा विचार करुन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जण थेट गुन्हेगारीकडे वळले. अशाच परिस्थितीने गांजलेल्या इस्टेट एजंटने चक्क सोनसाखळी चोरी केली. मात्र, समर्थ पोलिसांनी त्याला तासाभरात अटक केली. तेव्हा त्याने आपण आर्थिक कारणामुळे चोरी केल्याची कबुली दिली. 
मोहम्मद आतिफ इक्बाल शेख (वय २६, रा. नाना पेठ) असे या एजंटचे नाव आहे. भाजी आणण्यासाठी जात असलेल्या ज्येष्ठ महिलेचे पाठलाग करुन त्यांचे ३५ हजार रुपयांचे मंगळसुत्र हिसकावून चोरुन नेले होते. हा प्रकार रस्ता पेठेतील गृहलक्ष्मी अपार्टमेंटसमोर मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कपुरे, हवालदार साहिल शेख, संतोष काळे, निलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे, स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने शोध सुरु केला. आरोपीने हिरव्या रंगाच्या स्कुटरचा वापर केल्याची माहिती मिळाली. यावरुन पोलिसांनी हिरव्या रंगाची स्कुटर व दागिन्यांच्या दुकानांची तपासणी सुरु केली. परिसरातील फोन कॉलचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. त्यात शेख याचा नंबर शोधण्यात यश आले. शेख दागिने विकण्यासाठी नाना पेठेतील ज्वेलर्समध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्याला  ताब्यात घेतले. त्याच्याकडील दागिने काढून दाखविल्यावर फिर्यादी यांनी ते आपलेच असल्याचे सांगितले.
शेख हा नाना पेठ आणि कॅम्प परिसरात रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय करतो. लॉकडाऊनच्या काळात त्याचा व्यवसाय कमी झाला होता. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक चणचण जाणवत होती. त्यामुळे त्याने ज्येष्ठ महिलेचे मंगळसुत्र हिसकाविल्याचे समोर आले. आतिफ शेख याला आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

Web Title: Estate agent became Chain thief, lockdown led to a criminal route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.