Nagpur News: मांजराने घात केला, चिमुकल्याचा जीव गेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 23:07 IST2021-12-07T23:06:51+5:302021-12-07T23:07:15+5:30
शेतकरी कुटुंबातील एका चिमुकल्याचा मांजराने घात केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून शोककळा पसरली आहे.

Nagpur News: मांजराने घात केला, चिमुकल्याचा जीव गेला
नागपूर : शेतकरी कुटुंबातील एका चिमुकल्याचा मांजराने घात केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे सोमवारी दुपारपासून शोककळा पसरली आहे.
समतानगर मलका कॉलनीत अजय पाटील राहतात. ते शेती करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी शेतात फवारणी करण्यासाठी किटकनाशक आणून ठेवले होते. त्यांनी विषाचा डबा कपाटावर ठेवला. सोमवारी दुपारी ते घराबाहेर होते तर त्यांची पत्नी घरकामात व्यस्त झाली. दीड वर्षांचा त्यांचा रियांश ऊर्फ मुन्ना नामक चिमुकला घरात खेळत होता. कपाटावर चढलेल्या मांजराने विषाचा डबा खाली पाडला. त्यामुळे विष घरात पसरले. खाली खेळत असलेल्या निरागस मुन्नाने विषाने माखलेले हात शरीरावर लावतानाच अनवधानाने तेच हात तोंडात घातले.
काही वेळाने मुन्नाची आई घरात आली. तिने चिमुकल्याला उचलून त्याचे हात धुतले. आंघोळही घालून दिली. काही वेळानंतर विषाने प्रभाव दाखवला. चिमुकल्या मुन्नाची प्रकृती बिघडल्याने प्रारंभी त्याला खासगी आणि नंतर मेयोत दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी ३ च्या सुमारास मुन्नाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे समतानगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.