वृद्ध वाहनचालकाचा गळा चिरुन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 15:50 IST2023-03-24T15:50:05+5:302023-03-24T15:50:23+5:30
यावलनजीकची घटना : मृतदेह आढळला पुलाखाली

वृद्ध वाहनचालकाचा गळा चिरुन खून
- डी.बी. पाटील
यावल, जि. जळगाव : एका ६० वर्षीय वाहनचालकाचा गळा चिरुन नंतर दगडाचे ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना किनगाव (ता.यावल) शिवारात शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भिमराव शंकर सोनवणे (६०, रा. किनगाव ता. यावल) असे या खून झालेल्या इसमाचे नाव आहे.
यासंदर्भात मिळालेली माहीती अशी की, भिमराव सोनवणे हे किनगाव बुद्रुक येथे मुलगा व सुनेसह वास्तव्यास आहेत. खासगी वाहनावर ते चालक म्हणून काम करीत होते. गुरुवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने धारधार हत्याराने गळा चिरून नंतर दगडाने ठेचून त्यांचा खून केला. यानंतर चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती कळताच फैजपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
यासंदर्भात यावल पोलीस ठाण्यात विनोद सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे. मागील पाच महिन्याच्या कालावधीत खून झाल्याची यावल तालुक्यातील ही चौथी घटना आहे.