Eknath Shinde Threat Call: एकनाथ शिंदेंना धमकीमागे वेगळेच कटकारस्थान; लोणावळ्यातून फोन केला, एक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 21:34 IST2022-10-02T21:24:58+5:302022-10-02T21:34:09+5:30
Eknath Shinde Threat Call: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती दिली.

Eknath Shinde Threat Call: एकनाथ शिंदेंना धमकीमागे वेगळेच कटकारस्थान; लोणावळ्यातून फोन केला, एक ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कॉल सेंटरमध्ये कामाला असलेल्या एका तरुणाने पाण्याची बाटलीची किंमत जास्त लावल्याच्या रागातून हॉटेल मॅनेजरला त्रास देण्याच्या उद्देशाने दारुच्या नशेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू असल्याचा कॉल १०० नंबरला केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अविनाश आप्पा वाघमारे (वय३६,रा. रमाबाई आंबेडकर नगर, वसंतराव नाईक मार्ग, घाटकोपर,ईस्ट, मुंबई) याच्याविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी कलम १७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोणावळ्यातील हाटेल साई कृपा येथे पहाटे २ वाजून ४८ मिनिटांनी घडला होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अविनाश वाघमारे हा कॉल सेंटरमध्ये काम करतो. तो एका टॅव्हल्समधून मुंबईला चालला होता. टॅव्हल बस हॉटेल साई कृपा येथे चहापाण्यासाठी थांबली होती. दारुच्या नशेत असलेल्या वाघमारे यांची हॉटेलचे मॅनेजर किशोर पाटील यांच्याशी पाण्याच्या बाटलीचे किंमत जास्त लावल्याने वाद झाला. त्या रागातून हॉटेल मॅनेजर व कर्मचारी यांना त्रास देण्याच्या उद्देशाने त्याने मोबाईलवरुन १०० क्रमांकाला कॉल केला. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याचा प्लॅन चालू आहे, अशी खोटी माहिती दिली. लोणावळा शहर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याचा जबाब नोंदविला असून त्यांना १४९ नुसार नोटीस दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितले की, अविनाश वाघमारे हा मामा वारले म्हणून टॅव्हलने सांगलीला चालला होता. लोणावळ्यातील हॉटेलमध्ये त्याचा वाद झाल्याने त्याने हॉटेल मॅनेजरला त्रास देण्यासाठी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन हॉटेल साईकृपामध्ये काही लोक बसले असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा प्लॅन करीत असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर तो टॅव्हल्सने पुढे निघून गेला. मुंबई -बंगलोर रोडवरील खेड शिवापूर येथे टॅव्हल्स थांबवून त्याला ताब्यात घेतले.त्याने दारुच्या नशेत फोन केल्याचे कबुल केले.त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.