प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी दुकली गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 20:39 IST2020-03-17T20:37:22+5:302020-03-17T20:39:04+5:30
या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ करणारी दुकली गजाआड
मुंबई - जोगेश्वरी पश्चिमेकडील आदर्श नगर येथील नवशक्ती नगर परिसरात प्रसिद्ध दूध कंपन्यांच्या दुधाच्या पिशवीत दूषित पाणी मिसळून ते दूध ग्राहकांना वितरित करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या कक्ष - ९ ने अटक केली आहे. कक्ष - ९ चे पोलीस उपनिरीक्षक विजयेंद्र आंबवडे यांना खात्रीलायक खबऱ्याकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार मिळालेल्या माहितीची शहनिशा करून कारवाई करण्यात आली. श्रीनिवास मल्लेश नालमादी (४१) याचा धंदा दुधविक्रीची असून नवशक्ती नगर आदर्श नगर, लोटस पेट्रोल पंपाजवळ राहतो. तर जानया लिगय्या बट्टू (४२) याचा देखील धंदा दुधविक्रीचा असून तोही वरील पत्त्यावर राहतो. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन आणि बृहन्मुंबई महाराष्ट्र शासन येथील अन्न सुरक्षा अधिकारी यांच्यासह आज पहाटे ५ वाजता धाड टाकली. त्यावेळी त्यांनी दूध भेसळ करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. घटनास्थळी २३३ लिटर भेसळयुक्त दूध जागीच नष्ट करण्यात आले. तसेच दूध भेसळीसाठी वापरलेले सामान हस्तगत करण्यात आले. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात श्रीनिवास आणि जानया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.