नदीचे दगड नेणाऱ्या डंपरची अनेक वाहनांना धडक; लग्न समारंभाहून परतणारे १३ ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 08:36 IST2021-01-20T08:36:18+5:302021-01-20T08:36:51+5:30
Accident News: गेल्या काही दिवसांपासून असेच भीषण अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात धारवाडमध्ये डॉक्टर महिला गोवा टूरवर जात असताना भीषण अपघात झाला होता.

नदीचे दगड नेणाऱ्या डंपरची अनेक वाहनांना धडक; लग्न समारंभाहून परतणारे १३ ठार
कोलकाता : कडाक्याच्या थंडीत पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. जलपाईगुडीच्या धुपगुडी भागात डंपरने धडक दिल्याने 13 जण ठार झाले. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
धुपगुडीहून एक डंपर नदीचे दगड घेऊन मयनातलीच्या रस्त्याने जात होता. धुके असल्याने डंपर चालकाला पुढील काही दिसले नाही. यामुळे डंपरने समोरून येणाऱ्या वाहनांना जोरदार धडक दिली. ही ध़डक एवढी भीषण होती की पुढील वाहनांचा चेंदामेंदा झाला आणि 13 जणांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. यानंतर डंपर पलटी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातग्रस्त लोक हे विवाहसमारंभ आटोपून माघारी परतत होते.
West Bengal: 13 people died in an accident in Dhupguri city of Jalpaiguri district last night, due to reduced visibility caused due to fog. The injured were taken to a hospital. pic.twitter.com/HHUvqCist6
— ANI (@ANI) January 20, 2021
अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस आणि मदत करणारी टीम घटनास्थळी रवाना झाली. स्थानिकांनुसार अपघातात किती लोक मृत झाले, किती जखमी झाले याची माहिती मिळालेली नाही. मृतदेह काढलेल्यांची संख्या 13 आहे, गंभीर जखमींमुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे पोलिसांनी या अपघातात जखमी झालेल्या लोकांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. धुके असल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. मात्र, अपघाताची तीव्रता पाहता डंपर वेगात असण्याची शक्यता आहे. यामुळे पोलीस याचा तपास करत आहेत.
तिसरा भीषण अपघात
गेल्या काही दिवसांपासून असेच भीषण अपघात होत आहेत. गेल्या आठवड्यात धारवाडमध्ये डॉक्टर महिला गोवा टूरवर जात असताना भीषण अपघात झाला होता. यामध्ये १५ डॉक्टर ठार झाल्या होत्या. तर सोमवारी रात्री सूरतमध्ये उसाचा ट्रक पलटून झालेल्या अपघातात १४ मजूर ठार झाले होते. आजचा हा तिसरा अपघात आहे.