सहप्रवासीच निघाला चोर; वृद्ध व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 18:58 IST2019-10-27T18:57:15+5:302019-10-27T18:58:35+5:30
गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

सहप्रवासीच निघाला चोर; वृद्ध व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे अटक
मुंबई - बसमध्ये प्रवास करताना सहप्रवासीच चोर निघाला. मात्र, वृद्ध व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे त्याचा चोरीचा प्रयत्न फसला. गावदेवी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेडर रोड परिसरात राहणारे ६४ वर्षांचे मधू चंद्र पंजवाणी यांचे इलेक्ट्रॉनिक सामान विक्रीचे दुकान आहे. शुक्रवारी दुपारच्या सुुमारास ते घरी निघाले होते. मोहमद अली रोडवरून टॅक्सी मिळाली नाही म्हणून त्यांनी पायी चालत जात पायधुनी पोलीस ठाण्याजवळील बस स्टॉपवरून बस पकडली. जसलोक हॉस्पिटलकडील स्टॉप येण्यापूर्वीच उतरण्यासाठी ते पुढे येऊन उभे राहिले. त्या वेळी बसमधीलच एक प्रवासी त्यांच्या पुुढे येऊन उभा राहिला. व्यावसायिकाने त्याला मागे उभे राहण्यास सांगताच दोघांमध्ये वाद झाला. पुढील बस स्टॉपवर उतरायचे असल्याचे सांगत तो तेथेच उभा राहिला. याच गोंधळात त्याने व्यावसायिकाच्या खिशातील २५,००० रुपयांवर हात साफ केला. ही बाब लक्षात येताच व्यावसायिकाने त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांना त्याच्या अंगझडतीत चोरी केलेले पैसे सापडले.
सुशील छत्रधारी सिंग (३५) असे आरोपीचे नाव असून तो कल्याणचा रहिवासी आहे. त्याला पोलिसांनी अटक केली. तो हमालीचे काम करतो. त्याच्यासोबत डोंबिवलीचा राजेश नावाचा तरुणदेखील चोरीत सहभागी असल्याची माहिती चौकशीअंती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यानुसर गावदेवी पोलीस अधिक तपास करत आहेत.