हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 07:45 AM2022-08-17T07:45:33+5:302022-08-17T07:46:08+5:30

Drugs : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत हजार कोटी किमतीचा ५१३ किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक गिरिराज दीक्षित याला बेड्या ठोकल्या आहेत. 

Drugs worth thousand crores seized from Gujarat, action of anti-narcotics squad | हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

Next

मुंबई : ऑरगॅनिक रसायनशास्त्रातील पदवीधर आणि दोन कंपन्यांचा सीईओ राहिलेल्या एमडी तस्करीचा मास्टरमाइंड प्रेमप्रकाश सिंग (५२) याच्या चौकशीतून  एमडी तस्करीचे गुजरात कनेक्शन उघडकीस आले आहे. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत हजार कोटी किमतीचा ५१३ किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक गिरिराज दीक्षित याला बेड्या ठोकल्या आहेत. 

मुंबईतील शिवाजीनगर, गोवंडी येथून शमशुल्ला खान (३८) या ड्रग्ज तस्कराला २५० ग्रॅम एमडीसह ताब्यात घेत अटक केल्यानंतर अमली पदार्थविरोधी विभागाच्या वरळी कक्षाने ड्रग्ज विक्रीची ही साखळीच शोधून काढली आहे. त्यातील प्रेमप्रकाश हा वेगवेगळ्या फॅक्टऱ्यांमधून ड्रग्ज बनवून घेत असल्याची माहिती समोर आल्यावर अंबरनाथमधील फॅक्टरीचा व्यवस्थापक किरण पवार (५३) याला बेड्या ठोकल्या. 
त्यापाठोपाठ पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप काळे यांच्या पथकाने एमडी तस्करीचे गुजरात कनेक्शन उघडकीस आणले. अंकलेश्वर तालुक्यातील पानोली येथील दीक्षितची जीआयडीसीमधील फॅक्टरी उद्ध्वस्त केली. दीक्षित हा गेल्या १२ वर्षांपासून केमिकल फॅक्टरी चालवत आहे.

गेल्या वर्षभरापासून तोही सिंगच्या रॅकेटमध्ये सहभागी होत त्याला एमडी बनवून देत होता. गुन्हे शाखेच्या पथकाने १३ ऑगस्टला छापेमारी करत ५१३ किलो एमडी ड्रग्जसह एमडी तयार करण्याच्या प्रक्रियेतील ८१२ किलो पांढऱ्या रंगाची पावडर आणि ३९७ किलो वजनाचे तपकिरी रंगाचे खडे असा १ हजार २६ कोटींचा एमडी साठा जप्त केला आहे. 

आतापर्यंत २४०० कोटींचा माल जप्त 
अमली पदार्थविरोधी विभागाच्या वरळी कक्षाने या कारवाईत आतापर्यंत एकूण ७ आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याजवळून तब्बल २ हजार ४३५ कोटी रुपये किंमतीचा १ हजार २१८ किलो एमडी साठा जप्त केला आहे. तसेच अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

Web Title: Drugs worth thousand crores seized from Gujarat, action of anti-narcotics squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.