राजकुमार जाेंधळे, लातूर: एमडी ड्रग्जप्रकरणी यापूर्वीच दाेन आराेपींना अटक करण्यात आली होती. आता अन्य तिघांवर सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यानुसार विवेकानंद चाैक ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांनाही अटक केली आहे. रविवारी लातूर न्यायालयात हजर केले असता, त्यांना चार दिवसांची पाेलिस काेठडी सुनावण्यात आली. यात विद्यार्थी ग्राहक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील एलआयसी काॅलनीत एमडी ड्रग्ज असल्याची माहिती खबरीने पाेलिसांना दिली. या माहितीच्या पडताळणीनंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ११ जुलै राेजी एका घरावर छापा मारला. यावेळी लातुरातील गणेश अर्जुन शेंडगे (वय ३०) आणि मुंबईचा रणजीत तुकाराम जाधव (रा. दहिसर) याला अटक केली. त्याच्याकडून ७९ ग्रॅम एमडी ड्रग्जच्या पुड्या आणि गावठी पिस्टल जप्त केले. याबाबत विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास स्थागुशा आणि विवेकानंद चाैक ठाणे करीत आहेत. पाेलिसांच्या तपासात ड्रग्ज प्रकरणाचे धागेदाेरे मुंबईत असल्याचे समाेर आले असून विद्यार्थी याचे ग्राहक नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दाेघांच्या चाैकशीमध्ये तिघांची नावे झाली उघड
पाेलिसांच्या तपासात काेठडीत असलेल्या दाेन आराेपींनी ताेंड उघडले असून, आराेपींकडून ड्रग्ज सेवन करण्यासाठी विकत घेणाऱ्या ग्राहकांमध्ये अजय धनराज सूर्यवंशी (वय २१, रा. शिवपार्वतीनगर, कन्हेरी शिवार, लातूर), अजर सय्यद (२८, रा. रत्नापूर चौक, लातूर), अर्जुन ऊर्फ गोट्या अच्युतराव कुपकर (३०, रा. आर्वी, ता. जि. लातूर) यांची नावे समाेर आली. या तिघांवरही सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज विकत घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
आम्ही जवळचे मित्र; तिघांनी दिली कबुली
ताब्यात घेतलेल्या तिघांची कसून चाैकशी केली असता, आराेपी गणेश शेंडगे याचे आम्ही जवळचे मित्र आहाेत. आम्ही त्याच्याकडून स्वतःसाठी ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. जवळच्या मित्रांनाही शेंडगे याच्याकडून ड्रग्ज उपलब्ध करून देत असल्याचे या तिघांनी सांगितले.
‘त्या’ आराेपीच्या पाेलीस पथके मागावर
ड्रग्ज प्रकरणात सुरुवातीला दाेघांना अटक केली. तिसरा आराेपी अद्याप पसार आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि विवेकानंद चौक ठाण्याची संयुक्त पथके त्यांच्या मागावर आहेत. ड्रग्ज नेमके कुठून आले? कुणी-कुणाला दिले? याबाबतच्या गोपनीय माहितीचा संदर्भ शाेधला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या दिशेने तपास पथके रवाना झाली आहेत.