यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 11:47 IST2024-03-19T11:46:37+5:302024-03-19T11:47:15+5:30
ठाणे गुन्हे शाखेने दोघांना ठोकल्या बेड्या

यूपीत दीड महिना तळ ठाेकून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश; २८ कोटींचा मुद्देमाल केला जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: यूपीतील भगवतीपूर या छोट्याशा गावात दीड महिना वेषांतर करून ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश करण्यात ठाणे गुन्हे अन्वेषणच्या युनिट एकच्या पथकाला यश आले आहे. कारवाईदरम्यान वाराणसीतून अतुल सिंह (३६), संतोष गुप्ता (३८) यांना अटक करण्यात आली. या आरोपींकडून अडीच कोटींची २५ किलाे एमडी पावडर, ड्रग्ज बनविण्याचे रसायन, इतर साहित्य असा २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. पंजाब उगले यांनी दिली.
या कारवाईपूर्वी ठाण्यातील कासारवडवलीत २४ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत आफताफ अजीज मलाडा (२२), जयनाथ यादव (२७), शेरबहाद्दूर उर्फ अंकित (२३), हुसेन सय्यद (४८) यांना अटक केली हाेती. त्यांच्याकडून १४ लाखां एमडी जप्त केले होते. या आरोपींने दिलेल्या माहितीनुसार यूपीत कारवाई करण्यात आली.
तपासी पथकाचे पोलिस कौतुक
- आतापर्यंत या प्रकरणात सहा आरोपींना अटक केली. या कारवाईत आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलिस करत आहेत.
- न्यायालयामार्फत ट्रान्सिट कोठडी मिळाल्यानंतर त्यांना थेट विमानाने ठाण्यात आणण्यात आले.
- परराज्यात ठाणे पोलिसांनी पहिल्यांदाच ड्रग्ज निर्मितीच्या कारखान्याचा पर्दाफाश करुन आरोपींना सिनेस्टाईल पकडल्याने तपास पथकाचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी कौतुक केले आहे.
कसा झाला प्रकरणाचा तपास?
- या गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळक्याने यूपीतून ड्रग्ज आणल्याचे कबूल केले. त्यानुसार पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वपोनि दिलीप पाटील, सपोनि रुपाली पोळ, पोलीस उपनिरीक्षक आनंदा भिलारे, हवालदार विजय यादव आदींचे एक पथक तपासासाठी यूपीत गेले.
- ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळताच १६ मार्च रोजी यूपीच्या स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने पोलिसांनी छापा टाकला. त्यावेळी अतुल सिंह, संतोष गुप्ता या दोघांना एमडी ड्रग्जची निर्मिती करताना रंगेहाथ पकडण्यात आले.
- शेतातील एका घरातच थाटलेल्या ड्रग्ज फॅक्टरीतून एमडी बनविण्यासाठी लागणारे रसायन, इतर साहित्य, एक कार आणि दोन कोटी ६४ लाखांचे तयार एमडी असा २७ कोटी ८७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.