कारचालक डॉक्टरने ठाण्यात दोघांना उडविले, पोलिसांनी घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:41 IST2020-12-26T00:41:30+5:302020-12-26T00:41:43+5:30

Thane : हनी हा भरधाव वेगाने एका ऑडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली.

The driver doctor blew up the two in Thane, police took them into custody | कारचालक डॉक्टरने ठाण्यात दोघांना उडविले, पोलिसांनी घेतले ताब्यात

कारचालक डॉक्टरने ठाण्यात दोघांना उडविले, पोलिसांनी घेतले ताब्यात

ठाणे : अलीकडेच रशिया येथून आलेल्या वाघबीळ येथील हनी प्रदीप पाटील (२६) या क्ष-किरण तज्ज्ञाने (रेडिओलॉजिस्ट) कापूरबावडी ते कोपरी त्यानंतर सिडको बसथांबा या मार्गावर बेदरकारपणे भावाची मोटारकार चालवून दोघांना जखमी केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी त्याला नागरिकांच्या मदतीने ताब्यात घेतले.
हनी हा भरधाव वेगाने एका ऑडी मोटारकारने येत असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या कापूरबावडी उपविभागाच्या पथकाला शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मिळाली. माजीवडा येथे नाकाबंदीदरम्यान त्याची कार अडविण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने बॅरिकेड्स लावून सापळाही लावला. परंतु, त्यांना धुडकावून त्याने नितीन कंपनी आणि कोपरीमार्गे पळ काढून सिडको या ठिकाणी एका अपंगासह दोघांना उडविले. 
भन्नाट वेगाने आलेल्या हनी याला सिडको बसथांब्याजवळ काही स्थानिक नागरिकांनी अडवून चांगला चोपही दिला. त्यानंतर त्याला ठाणेनगर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्या वाहन चालविण्यावरून तो मद्यपी असल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे वैद्यकीय तपासणीमध्ये आढळल्याचे ठाणेनगर पोलिसांनी सांगितले. त्याच्या कारच्या धडकेने जाधव हे दुचाकीस्वार जखमी झाले. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय, अन्य किरकोळ जखमींपैकी कोणीही तक्रार केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले. 
रेडिओलॉजिस्ट असलेला हनी अलीकडेच रशियातून ठाण्यात आला आहे. त्याने अशा प्रकारे बेदरकारपणे कार का चालविली, हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरितच आहे. त्यामुळे संबंधित डाॅक्टरचा सखोल तपास करण्यात येत असल्याची माहिती ठाणेनगर पोलिसांनी दिली.

वाहतूक पोलिसांमुळे टळला मोठा अनर्थ
माजीवडा येथून निघाल्यानंतर वागळे इस्टेट वाहतूक पोलिसांनी कोपरी ब्रिज तसेच नितीन कंपनी येथील उड्डाणपूल बंद केला. त्यामुळे त्याने गुरुद्वारामार्गे कोपरीत शिरकाव केला. जर हे मार्ग अडविले नसते तर पूर्व द्रुतगती मार्गाने मुंबईत शिरकाव करून त्याने आणखी मोठे अपघात केले असते, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Web Title: The driver doctor blew up the two in Thane, police took them into custody

टॅग्स :Accidentअपघात