DRI ची मोठी कारवाई! JNPT बंदरातून ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 21:54 IST2021-07-05T21:53:10+5:302021-07-05T21:54:02+5:30
DRI seized Drugs : या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे.

DRI ची मोठी कारवाई! JNPT बंदरातून ८७९ कोटींचे अमली पदार्थ जप्त
समुद्री मार्गाने मुंबईत मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ दाखल होणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला (DRI) मिळाली होती. याआधीही परदेशातून आयात करण्यात आलेल्या मालाच्या आडून अमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना समोर आल्याने डीआरआयकडून जेएनपीटीत उतरलेल्या मालाची पाहणी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये अफगाणिस्तानातून तुरटी व टॅल्कम पावडर घेऊन इराणमधील बंदराच्या मार्गाने आलेल्या एका कंटेनरवर डीआरआय आणि सीमा शुल्क अधिकार्यांना संशय आला. या कंटेनरची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये सुमारे २९३ किलो किलो हेरॉईन सापडले. जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात ८७९ कोटी रुपये इतकी आहे.
या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. जेएनपीटीत उतरविण्यात आलेले हे हेरॉईन मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरात नंतर वितरीत होणार होते. हा माल कोणत्या कंपनीने मागविला होता, याचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र या प्रकरणात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही जेएनपीटी बंदरात १९१ किलो इतके हेरॉईन सापडले होते. आयुर्वेदिक उपचारांसाठी वापरल्या जाणार्या मुलेठीच्या आयातीच्या आडून ही तस्करी करण्यात आली होती. गेल्या काही वर्षात समुद्री मार्गाने भारतात अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे.
गेल्या सहा महिन्यात सुमारे ५ हजार कोटींचे अमली पदार्थ भारतीय समुद्री क्षेत्रात तटरक्षक दल व नौदलाने कारवाईत जप्त केले आहेत. मार्च महिन्यात लक्षद्विपजवळ एका श्रीलंकन बोटीतून ३०० किलो हेरॉईनसह पाच एके-४७ रायफली जप्त करण्यात आल्या होत्या.