डोंबिवलीः ज्वेलर्सकडील ३५ लाखांचे सोने लंपास करणारा भामटा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2022 22:01 IST2022-08-01T22:01:28+5:302022-08-01T22:01:57+5:30
रामनगर पोलिसांनी पुणे येथून रविवारी केली अटक

डोंबिवलीः ज्वेलर्सकडील ३५ लाखांचे सोने लंपास करणारा भामटा गजाआड
डोंबिवली, लोकमत न्यूज नेटवर्क: नवीन ज्वेलर्सचे दुकान उघडणार असल्याचे सांगत ज्वेलर्सचा व्यवसाय चालविणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीकडून तब्बल ३५ लाख रुपयांचे जवळपास ७०० ग्रॅम वजनाचे दागिने घेवून पसार झालेल्या भामट्याला रामनगर पोलिसांनी पुणे येथून रविवारी अटक केली. विश्वनाथ जगताप असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचाकडून दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली पूर्वेत राहणारे धनसुख पोपटलाल जैन यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे.याच परिसरात राहणारा विश्वनाथ जगताप याचा जैन यांच्याशी परिचय होता. याचा फायदा घेत विश्वनाथ याने आपल्याला नवीन ज्वेलर्स चे दुकान सुरू करायचं आहे असे सांगत डिसप्लेसाठी जैन यांच्याकडून ३५ लाख रुपयांचे जवळपास ७०० ग्रँम वजनाचे दागिने घेतले होते. मात्र बरेच दिवस उलटले तरी विश्वनाथ दागिने परत देत नव्हता काही दिवसांनी विश्वनाथ पसार झाला.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी या प्रकरणी राम नगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली . तपासादरम्यान विश्वनाथ पुण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या आधारे रामनगर पोलिस ठाण्याच्या पथकाने पुणे येथे जाऊन आरोपीला अटक केल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्याकडून देण्यात आली आहे.